नागपूर - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत केंद्रावर कॉपीची प्रकरणए आढळल्यास कारवाईची तंबी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली होती. याप्रकरणी बोर्डाने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील केंद्रावर दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीची प्रकरणे आढळून आली.
या केंद्रावरील केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षक अशा चौघांना विभागीय शिक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी निलंबित केले असून इतर दोघांची प्रशासकीय चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वीय विभागीय शिक्षण मंडळाने सहा शिक्षकांच्या निलंबनासाठी शिफारस केली होती.
दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षांमधील कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळासह संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे. अभियान यशस्वी करण्यासाठीच शिक्षण मंडळासह जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागामार्फत प्रयत्न करीत, प्रत्येक स्तरावर भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. असे असताना काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले.
ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार घडले, त्या केंद्रांच्या ६ शिक्षकांना निलंबित करण्याची शिफारस केल्याची माहिती विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी दिली. यामध्ये वर्धातील वायगाव, गडचिरोलीतील मुलचरा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नवागाव येथील प्रत्येकी एक केंद्रप्रमुख आणि खोलीतील पर्यवेक्षकाचा समावेश होता.
सध्या त्यातील गडचिरोली आणि चंद्रपूर येथील दोन पर्यवेक्षक आणि दोन केंद्रप्रमुखांना निलंबित करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील पर्यवेक्षक आणि दोन केंद्रप्रमुखाची प्रशासकीय चौकशी सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून होते आदेश
मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसाच्या कृती आराखड्यात परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते.
दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक व कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यातूनच बोर्डाने ही कारवाई केल्याचे समजते.
बोर्डाकडून होणारी केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकावर होणारी कारवाई ही इतर केंद्रांना धडा असेल. भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार आढळल्यास अशाच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
- चिंतामण वंजारी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर.