पुणे : पुण्यामध्ये बस स्थानकात युवतीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रेय गाडे याची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस गुरुवारी जाहीर केले. त्याला पकडण्यासाठी पोलिसांची आठ पथके कसून तपास करीत आहेत.
स्वारगेट बस स्थानकाच्या शिवशाही बसमध्ये युवतीवर पहाटे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. त्या युवतीच्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून आरोपीची ओळख पटली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे जिल्हा पोलिसांकडे पाच तर स्वारगेट पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक शिरूर तालुक्यातील गुनाट येथे पोचले.
तेथे सुमारे २०० पोलिसांनी गावाला वेढा घालून दिवसभर तपास मोहीम राबविली. त्यात उसाच्या शेतांमध्येही कसून शोधमोहीम राबविण्यात आली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तिथे ड्रोनचाही वापर केला. मात्र, गाडेचा शोध लागू शकलेला नाही. दरम्यान या प्रकरणावरून स्वारगेट बस स्थानकात गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षातर्फे तसेच अन्य संघटनांनीही आंदोलन केले.
कदम यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्नभूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि काही वेळानंतर सोडून दिले. दरम्यान, एसटी प्रशासनानेही आता स्थानकातील सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. नवे सुरक्षारक्षक नियुक्तीच्या प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल, अशी माहिती एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.