Pratap Sarnaik : बसस्थानकांचे होणार सुरक्षा लेखापरीक्षण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
esakal February 28, 2025 10:45 AM

मुंबई : राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करावे, स्थानक व आगारांमध्ये उभ्या असलेल्या बस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांची १५ एप्रिलपर्यंत विल्हेवाट लावण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

स्वारगेट येथील बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मंत्री सरनाईक यांनी राज्यातील बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठक घेतली. अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या दालनात घेण्यात आलेल्या या बैठकीस परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय (प्रभारी) विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

‘एआय’वर आधारित यंत्रणा

परिवहनमंत्री सरनाईक म्हणाले की राज्यभरात सर्वच बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्हीची ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभी करावी, नवीन बसमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करावे. बसस्थानकावर स्थानिक पोलिसांची गस्त वाढविण्याची सूचना करतानाच आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे.

बस बंद झाल्याची खात्री करा

‘बसस्थानक अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालक – वाहक यांनी आगारात आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. बसचे दरवाजे बंद करण्याची काळजी घ्यावी व साध्या बसमध्ये दरवाजासह खिडक्याही बंद असल्याची खात्री करावी. बस स्थानकांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या अनोळखी इसमांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,’ असे निर्देश परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत.

सुरक्षेबरोबर स्वच्छता महत्त्वाची

बसस्थानकांवर स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड न करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या आहेत. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात याव्यात. प्रत्येक बसस्थानकावर महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. ही स्वच्छतागृहे प्रशस्त असावीत. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा वेळोवेळी आढावा घ्यावा असेही त्यांनी सांगितले. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याची सूचना मंत्री सरनाईक यांनी केली आहे.

पोलिस यंत्रणेला फटकारले

नवी दिल्ली : पुण्यातील अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत आरोपी फरार झाल्यावरून राज्य पोलिसांना फटकारले आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या कारवाईचा अहवाल व गुन्हा नोंदणीची प्रत तीन दिवसांत आयोगाकडे सादर करावी असे आदेश देण्यात आले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहून तातडीने कारवाईची मागणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.