Afghanistan vs Australia, Champions Trophy 2025 : भारत, न्यूझीलंड यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला आहे. अफगाणिस्तान विरुद्धची ब गटातील लढत पावसामुळे रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाचा मार्ग मोकळा झाला. आता चौथा संघ उद्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या लढतीनंतर ठरेल. या सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवल्यास ते ब गटातून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत जातील, पण, इंग्लंड जिंकल्यास अफगाणिस्तानला संधी असेल, परंतु नेट रन रेटवर याचा फैसला होईल.
सेदीकुल्लाह अटलच्या ८५ धावा आणि ९५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. अझमतुल्लाह ओमारजाई शेवटच्या षटकातपर्यंत मैदानावर उभा राहिला आणि ६३ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावांची खेळी करून माघारी परतला. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ २७३ धावांवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाकडून बेन डॉरश्यूईसने ३, तर स्पेन्सर जॉन्सन व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाला मॅथ्यू शॉर्ट व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. शॉर्ट १५ चेंडूंत २० धावांवर झेलबाद झाला. परंतु त्यापूर्वी अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी तीन सोपे झेल टाकले आणि झेल सोडणाऱ्यांमध्ये राशिद खान हा एक होता. ऑस्ट्रेलियाने पाच षटकांत अर्धशतक पूर्ण केले. अफगाणिस्तानकडे अव्वल दर्जाचे फिरकीपटू आहेत, याची जाण ऑसींना होती. त्यामुळेच ट्रॅव्हिस हेडने त्यांच्या जलदगती गोलंदाजांनावर पॉवर प्लेमध्ये आक्रमक केले आणि खोऱ्याने धावा चोपल्या.
हेडने ४० चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५९ धावांची खेळी केली आणि संघाला १२.५ षटकांत १ बाद १०९ धावांपर्यंत पोहोचवले. त्यावेळी पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये ९० धावा चोपल्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी श्रीलंकेने २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८७ धावा केल्या होत्या. ९.३० वाजता सामना रद्द झाल्याच निर्णय घेतला गेला आणि ४ गुणांसह ब गटातून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीचे स्थान पक्के केले.
ब गटात ऑस्ट्रेलिया ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी ३ गुण आहेत. पण, आफ्रिकेचा नेट रन रेट हा २.१४० असा आहे, तर अफगाणिस्तानचा -०.९९० असा आहे. त्यामुळे जरी इंग्लंडविरुद्ध आफ्रिकेचा पराभव झाला, तरी नेट रन रेटच्या जोरावर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. आफ्रिकेला २०७ किंवा त्याहून अधिक धावांनी हार पत्करावी लागली, तर अफगाणिस्तानची संधी आहे.