Jos Buttler Resigns as England Captain : स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघात मोठी उलथापालथ झाली आहे. इंग्लंडच्या व्हाईट-बॉल संघाचा कर्णधार जॉस बटलरने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही बातमी इंग्लंड क्रिकेट संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे. बटलरच्या नेतृत्वाखाली संघाने काही मोठ्या विजयांची नोंद केली होती, पण चॅम्पियन्स ट्रॉफीतील सध्याच्या स्थितीमुळे त्याने पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आता कोणाच्या हाती जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हणाला, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. ही स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वाची होती आणि त्यात दोन पराभवामुळे आमचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे आणि पण संघाच्या भविष्याच्या हितासाठी हा निर्णय घ्यायला हवा होता.
सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडला पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. जॉसने या सामन्यात २३ व ३८ धावा केल्या होत्या. या पराभवामुळे इंग्लंडचे पॅक अप झाले. या स्पर्धेला दाखल होण्यापूर्वी इंग्लंडला टीम इंडियाकडून वन डे मालिकेत ०-३ असा मार खावा लागला होता.
बटलरने वन डे क्रिकेटमध्ये १८६ सामन्यांत ११ शतकं व २७ अर्धशतकांसह ५१७५ धावा केल्या आहेत. ५७ कसोटी सामन्यांत त्याच्या नावावर २९०७ धावा आहेत, तर १३४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त त्याने ३५३५ धावा केल्या आहेत. जॉस बटलरनंतर इंग्लंडच्या वन डे संघाचे नेतृत्व बेन डकेट, फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक यांच्यापैकी एक सांभाळू शकतो.
इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. आफ्रिकेने दोन सामन्यांत ३ गुण कमावले आहेत आणि ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. आज अफगाणिस्तान संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाल्यास आफ्रिकेच्या उपांत्य फेरीच्या स्थानावर शिक्कामोर्तब होईल. पण, अफगाणिस्तानने बाजी मारल्यास आफ्रिकेला काही करून इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.