माळेगाव - माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी मंडळींनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. कोणतीही टिकाटिपणी न करता सोमवार (ता. ३) पासून अजित पवार यांच्या विचाराची सत्ताधारी मंडळी माळेगावच्या कार्य़क्षेत्रात गट निहाय सभा घेणार आहेत.
अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनीही याआगोदर माळेगावच्या निवडणूकीसाठी दंड थोपटले होते. त्या पार्श्वभूमिवर माळेगावच्या निवडणूकीचे वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापण्याची चिन्हे दिसून आहेत.
माळेगाव साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक (२०२५-२०३०) अनुषंगाने पुणे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) अंतिम मतदार यादी याआगोदर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये १९ हजार ५४९ सभासदांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे.
त्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्तापासूनच सत्ताधारी व विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामध्ये सत्ताधारी गटाचे प्रमुख व माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी गटनिहाय सभा घेण्याबाबत तयारी झाल्याचे सांगितले.
ते म्हणाले, की गटनिहाय सभांमध्ये कोणावरही टिका टिपणी न करता केवळ कारखाना प्रशासनाचे पाच वर्षाचे चांगले कामकाज सभासदांपुढे माडण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्या पार्श्वभूमीवर गटनिहाय दौरा निश्चित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची उद्या ( शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिटींग बोलविली आहे.`
दुसरीकडे, माळेगावची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी निवडण्यासंदर्भात तयारी आहे. त्यानुसार कार्य़कर्ते व सभासदांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांनी मंगळवार (ता. २५ फेब्रूवारी) रोजी बारामतीत पक्ष कार्यालयात बैठक घेतली होती.
त्यामध्ये त्यांनी माळेगाव'ची पंचवार्षिक निवडणूक ही पवारसाहेबांच्या सूचनेनुसार लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे याही माळेगावच्या निवडणूकीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनीही सभासदांचे ज्वलंत प्रश्न पुढे करीत सभासदांशी संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार (ता.५ मार्च) रोजी सौ. सुळे स्वतःहा कारखाना कार्यस्थळावर येणार असल्याचा पत्रव्यवहार त्यांनी केला आहे.
याचाच अर्थ यंदा माळेगावच्या निवडणूकीत पवार विरुद्ध पवार असे पॅनेल आमनेसामने येतात का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. तसेच या राजकीय रणधुमाळीमध्ये पवारांचे जुने विरोधक व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनीही आमचा स्वतंत्र पॅनेल असणार आहे, असे सध्यातरी ते सांगत आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी ठरले...
माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. तसे नियुक्ती पत्र पुणे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाने अधिकारी श्री. नावडकर यांना पाठवविले आहे. त्यामुळे या निवडणूकीचा कार्यक्रम कधी जाहिर होतो, याबाबतची विचारणा अनेक पदााधिकाऱी प्रांताधिकाऱ्यांकडे करताना दिसून येतात.