आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी अधिकृतरित्या 3 संघ निश्चित झाले आहेत. ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर बी ग्रुपमधून शुक्रवारी 28 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. आता 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहचतील. तसेच जर इंग्लंडने हा सामना 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने जिंकला तरच अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहचेल, ज्याची शक्यता फार कमी आहे. इंग्लंड या स्पर्धेतून आधीच बाहेर झाली आहे. इंग्लंडने सलग 2 सामने गमावले. तर इंग्लंडने साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.
उपांत्य फेरीत पोहचलेल्या दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागलाय.दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा हा आजारामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे टेम्बा बावुमाऐवजी एडन मारक्रम हा या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नेतृत्व करत आहे. टेम्बा आजारी असल्याने या सामन्यातून बाहेर झाल्याची माहिती एडनने टॉस दरम्यान दिली.
दक्षिण आफ्रिकेने या साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. आजारामुळे टेम्बा बावुमा आणि टॉनी डी जॉर्जी या दोघांना बाहेर व्हावं लागंल आहे. तर या दोघांच्या जागी ट्रिस्टन स्टब्स आणि हेन्रिक क्लासेन यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान जोस बटलर याचा कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना आहे. जोस बटलरच्या नेतृ्त्वात इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे बटलरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. इंग्लंडचं या स्पर्धेत अकाउंट झिरो बॅलन्स आहे. त्यामुळे जोस बटलर याचा कर्णधार म्हणून शेवटच्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी