भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना 4 मार्चला होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास विचित्र पद्धतीने झाला. पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. ऑस्ट्रेलियाने 4 गुणांसह उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं. पण उपांत्य फेरीत दुबई की लाहोरला खेळायचं हे निश्चित होत नव्हतं. त्यामुळे तिसरा सामना होतात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांनी दुबईला कूच केली. आता कोणता संघ दुबईत राहणार आणि कोणता लाहोरला जाणार हे भारत न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून होतं. पण भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियाचा लाहोर रिटर्न प्रवास वाचला. आता दक्षिण अफ्रिकेला न्यूझीलंडसोबत लाहोरला परतावं लागणार आहे.
दुसरीकडे, धावपळीच्या वेळापत्रकामुळे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एडम झाम्पा याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘स्पष्टच सांगायचं तर पाकिस्तानात काही सामने खेळताना आमचं वेळापत्रक धावपळीचं होतं. या शहरातून त्या शहरात जावं लागलं होतं. पण दुबईत येऊन बरं वाटलं. आयसीसी अकादमीत चांगली सुविधा आहे. काही बदल करणं आवश्यक आहे. पण खेळाडूंना सर्वकाही ठीक वाटत आहे.’, असं एडम झाम्पा म्हणाला.
दुबईची खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी आहे. वरुण चक्रवर्तीने हे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून एडम झाम्पा हे प्रमुख हत्यार असणार आहे. यावर बोलताना एडम झाम्पाने सांगितलं की, ‘खरं सांगायचं तरी मी माझी सर्वोत्तम कामगिरी करत आहे असं वाटत नाही. माझ्याकडून चांगली कामगिरी होत नाही हे मला कळतं. पण मोठ्या विकेट घेण्याची क्षमता आहे हे मी नाकारू शकत नाही. त्यामुळे मी माझं सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नशील असेल.’ रोहित शर्माने या स्पर्धेत एकूण 4 विकेट घेतल्या आहेत.