रोहित शर्माला लठ्ठ म्हटल्यानंतर वादाची ठिणगी, बीसीसीआयने काँग्रेस नेत्याला थेट दिलं उत्तर
GH News March 03, 2025 06:13 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. रोहित शर्माने पुन्हा एकदा आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. भारतीय संघ जेतेपदापासून दोन पावलं दूर आहे. असं असताना काँग्रेस नेत्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर वादग्रस्त टीका केली आहे. यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. आता वाद तासागणिक आणखी चिघळत असल्याचं दिसत आहे. रोहित शर्मा जाडा असल्याची टीका केल्याने हा वाद वाढला आहे. यावर आता बीसीसीआयकडून उत्तर आलं आहे. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहित शर्मा कर्णधार म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत आहे. अशावेळी काँग्रेस नेत्याने केलेली टीका निंदनीय आहे.

बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, ‘एका जबाबदार व्यक्ती अशा प्रकारे वादग्रस्त टीका करते हे शोभत नाही. संघ एका महत्त्वपूर्ण स्पर्धेत खेळत आहे. यामुळे संघ आणि खेळाडूवर वाईट परिणाम होऊ शकतो. कृपया अशा प्रकरची विधानं करू नका.’ काँग्रेस नेत्या आणि प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला टॅग करून पोस्ट केली होती. ‘एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाडा आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. इतकंच काय तर भारताचा सर्वात निष्प्रभावी कर्णधारही आहे.’ अशी पोस्ट त्यांनी केली होती. यानंतर वाद झाला आणि त्यांनी पोस्ट डिलिट केली.

काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी यानंतर सारवासारव केली. शमा मोहम्मद यांनी सांगितलं की, ‘माझ्या ट्वीटचा उद्देश कोणाला अपमानित करण्याचा नव्हता. ट्वीटच्या माध्यमातून मी इतकंच सांगितलं की, खेळाडू म्हणून रोहितच वजन जास्त आहे. मी कोणतीही बॉडी शेमिंग टीका केली नाही. हे बॉडी शेमिंग नाही. मी सांगितलं होतं की एक असा कर्णधार आहे त्याचा जास्त प्रभाव नाही. मी त्याची तुलना इतर कर्णधारांशी केली.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.