भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli) आपल्या खेळकर वृत्तीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान, श्रेयस अय्यरच्या क्षेत्ररक्षणातील चुकांची कोहलीने नक्कल करून त्याची खिल्ली उडवली. तसेच, अक्षर पटेलने केन विल्यमसनला बाद केल्यानंतर, कोहलीने पटेलच्या जवळ जाऊन त्याच्या पायांना स्पर्श करून कृतज्ञता व्यक्त केली. त्याने प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या सेलिब्रेशन स्टाईलची नक्कर केलेली पाहायला मिळाली.
किवी कर्णधार केन विलियम्सन मैदानावर उभा असेपर्यंत टीम इंडिया सामना हरेल, असे वाटत होते. पण अक्षर पटेलने विलियम्सनला बाद करून संघाला सर्वात महत्त्वाचे यश मिळवून दिले. १२० चेंडूत ८१ धावा करून विलियम्सन बाद झाला. विल्यमसन बाद झाला तेव्हा संघाने १६९ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. ४१ व्या षटकात तो बाद झाला आणि अक्षर पटेल व कोहलीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.
श्रेयस अय्यर ( ७९) व अक्षर पटेल ( ४२) यांच्यानंतर हार्दिक पांड्या ( ४५) व लोकेश राहुल यानेही २३ धावांचा हातभार लावला. भारताने ९ बाद २४९ धावा केल्या. किवींच्या मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेतल्या. हार्दिकने धक्का दिल्यानंतर किवींना नंतर सावरता आले नाही. कर्णधार केन विलियम्सनने संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण, भारतीय गोलंदाजांसमोर त्यांना टीकता आले नाही. वरुण चक्रवर्थीने ५ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४५.३ षटकांत २०५ धावांवर बाद झाले. कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या.
याच सामन्यात श्रेयस अय्यरकडून क्षेत्ररक्षणात थोडा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. श्रेयसने चेंडू अडवला, परंतु तो शोधण्यासाठी तो गर्रगर फिरताना दिसला. विराटने त्याची नक्कल केली. त्यानंतर सीमारेषेवर विराटने पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखे सेलिब्रेशन केले.
भारताने ग्रुप अ मध्ये अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना होईल. न्यूझीलंड संघ ३ मार्च रोजी सकाळी लवकर लाहोरला रवाना होईल, जिथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना मंगळवार, ४ मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल, तर दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी खेळला जाईल.