बीड : परळी येथील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सोमवारी (ता. तीन) सकाळी नातेवाइकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. आश्वासन मिळताच सायंकाळी त्यांनी उपोषण स्थगित केले.
भोपळा (ता. परळी) येथील रहिवासी महादेव दत्तात्रय मुंडे परळीत स्थायिक होते. ता. २१ ऑक्टोबर २०२३ ला त्यांचे अपहरण करून ता. २२ ऑक्टोबरला त्यांचा तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह परळीच्या तहसील कार्यालयासमोरील जागेत टाकण्यात आला होता. यावरून परळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
अद्याप खून प्रकरणाचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या प्रकरणालाही वाचा फुटली. आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर याचा तपास पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे सोपविला. तपासासाठी पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह आणखी चौघांचा समावेश करण्यात आला. मात्र, अद्यापही या प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआडी) सोपवावा, यासह इतर मुद्द्यांचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
दरम्यान, घटेनला १६ महिने उलटूनही न्याय मिळत नसल्याने आता त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, वडील दत्तात्रय मुंडे, गोविंद फड, भगवान फड, सतीश फड, तुळसाबाई फड व छाया फड आदी नातेवाइकांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांनी भेट दिली. याप्रकरणी पंधरा दिवसांत तपास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर ज्ञानेश्वरी, दत्तात्रय मुंडे आदींनी सायंकाळी उपोषण स्थगित केले.