सोलापूर : सोलापूर शहर व परिसरात आज यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूरच्या कमाल तापमानाची आता ४० अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मार्चच्या सुरवातीलाच उन्हाचा चटका वाढू लागल्याने यंदाच्या उन्हाळ्याबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
रविवारी सोलापुरात ३९.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत आज सोलापुरचे तापमान १ अंश सेल्सिअसने वाढले आहे. काही दिवसांपासून सोलापूर शहर व परिसराच्या कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.
मार्चच्या सुरवातीलाच तापमानाचा पारा वाढू लागला आहे. होळीनंतर उन्हाची तिव्रता अधिक वाढत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. या वर्षी १३ मार्च रोजी होळी आहे. होळीपूर्वीच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊ लागला आहे. होळीनंतर सोलापूरचे तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या सोलापुरात वाढत्या तापमानासोबत उकाडाही वाढू लागला आहे. सकाळी ९ ते ९.३० पासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका असल्याने अनेकजण दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडणे शक्यतो टाळू लागले आहेत. दुपारच्या सुमारास, रात्री उकाडा वाढल्याने फॅन, एसी वापराचे प्रमाण वाढले आहे. उकाड्यापासून आणि उन्हाच्या चटक्यांपासून संरक्षण करण्यासाठी थंड पदार्थ, थंड पेय, सुती कपडे, टोपी, गॉगल्स यांचा वापर वाढू लागला आहे.
पाच दिवसातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
२८ फेब्रुवारी : ३६.८
२७ फेब्रुवारी : ३६.९
३ मार्च : ३८.९
२ मार्च : ३७.९
१ मार्च : ३७.६