कर्णधार रोहित शर्माचा वनडे क्रिकेटचा अंतिम सामना! क्रिकेटला ठोकणार रामराम?
GH News March 05, 2025 02:06 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा ही रोहित शर्माच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत मजल मारली. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने  4 गडी आणि 11 चेंडू राखून गाठला. या सामन्यात रोहित शर्माने 28 धावांची खेळी केली. रोहित शर्माकडून अंतिम फेरीत चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. रोहित शर्मा आता 38 वर्षांचा आहे. टी20 फॉर्मेटमधून त्याने वर्ल्डकप विजयानंतर निवृत्त झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीची शेवटची स्पर्धा असेल अशी चर्चा आहे. रोहित शर्माने याबाबत काही स्पष्ट केलं नाही. पण बीसीसीआय रोहित शर्माला पुढे संधी देईल की नाही याबाबत शंका आहे. कारण यानंतर वनडे फॉर्मेटमध्ये 2027 मध्ये वर्ल्डकप होणार आहे. यासाठी नव्याने टीम बांधण्याचं बीसीसीआयसमोर आव्हान आहे. त्यामुळे रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणं कठीण आहे.

रोहित शर्मा त्याचा वनडे क्रिकेट कारकिर्दितील शेवटचा सामना खेळेल असंच म्हणावं लागेल. अंतिम सामन्यात न्यूझीलंड किंवा दक्षिण अफ्रिकेशी लढत होणार आहे. त्यानंतर पुढे दोन महिने आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद असण्याची शक्यता खूपच कमी आहे. कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे जाईल अशीही क्रीडावर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, वनडे क्रिकेटचं यानंतर कोणतंच शेड्युल दिसत नाही. त्यामुळे रोहित शर्मा त्याच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना खेळला असं बोललं जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने वनडे क्रिकेटमध्ये दोन आशिया कप जिंकले आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 विजयाच्या वेशीवर संघ होता. पण अंतिम फेरीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीपर्यंत रोहित शर्माने 55 सामन्यात नेतृत्व केलं आहे. यात 41 सामन्यात विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 74.07 इतकी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.