पुणे - भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधूल केबल आज दुपारी बाराच्या सुमारास जळाल्याने लोहगाव, वडगावशेरीसह नगर रस्त्यावरील मोठ्या भागातील पाणी पुरवठा अचानक विस्कळित झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्री उशिरा केबल दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, उद्या (ता. ६) दुपारनंतर या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
भामा आसखेड धरणातून जवळपास ६३ किलोमीटर अंतरावरून पुण्यामध्ये पाणी आणले जाते. २०२१ मध्ये प्रकल्पातून वडगाव शेरी, संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ, विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी, नगर रस्ता परिसरात पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या दोन तीन दिवसांपासून वडगाव शेरी भागात पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी होत्याच. त्यातच आज दुपारी भामा आसखेडच्या जॅकवेलमधील केबल जळाल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे.
जॅकवेलच्या ठिकाणी लगेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले, ते काम रात्री उशिरा पूर्ण झाले आहे. पण सुमारे १० तास जॅकवेल बंद असल्याने दिवसभर पाणी पुरवठा होऊ शकला नाही. रात्री उशिरा पंपिंग सुरु झाले असले तरी गुरुवारी (ता. ६) या धरणावर अवलंबून असलेल्या नगर रस्ता आणि अन्य भागात पाणी पुरवठा विस्कळित असण्याची शक्यता आहे.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, भामा आसखेड जॅकवेलमधील केबल जळाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या भागाचा पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. या ठिकाणी दुरुस्तीचे काम रात्री पूर्ण झाले आहे. काही प्रमाणात पाणी पुरवठा यामुळे विस्कळित झाला आहे.
अघोषित पाणी कपात नाही
पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने महापालिकेने अघोषित पाणी कपात केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सिंहगड रस्ता, कोथरूड, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडगाव शेरी यासह अन्य भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाने आज शहरातील पाणी पुरवठ्याचा आढावा घेतला.
त्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील रोहिन कृत्तिका व एलएमआर टाकीसाठीचा पंप बदलण्याचे काम करावे लागल्याने सिंहगड रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, गोखलेनगर, जनवाडी यासह अन्य भागातील पाण्याचे वेळापत्रक बदलले आहे. काही भागात कमी दाबाने व उशिरा पाणी गेले आहे. पण आता या भागातील पाणी पुरवठा पूर्ववत झाला आहे, महापालिकेने अघोषित पाणी कपात केलेली नाही, असे जगताप यांनी सांगितले.