हिसार (हरियाना) : प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जगातील सर्वात मोठ्या तात्पुरत्या सिद्ध महामृत्युंजय यंत्राच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर, आता हिसारजवळीला मायेर गावात कायमस्वरूपी ५२ फूट बाय ५२ फूट लांबी-रुंदीचे सिद्ध महामृत्युंजय यंत्र उभारणी सुरू आहे. हे काम आता लवकरच पूर्ण होईल.
राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि नियमांनुसार प्रयागराज यंत्र लवकरच विसर्जित केले जाईल, परंतु तत्पूर्वी, हिसार यंत्र भक्तांना समर्पित केले जाईल. या आध्यात्मिक प्रतिकात्मक यंत्राची पायाभरणी ७ डिसेंबर २०२४ रोजी हिसारच्या आमदार सावित्री जिंदाल यांनी केली होती.
जागतिक कल्याणासाठी एक दैवी रचना असलेल्या या भव्य यंत्र स्थापनेद्वारे या संशोधन केंद्राचे संस्थापक स्वामी सहजानंद नाथ यांनी आजीवन स्वप्न साकारत आहे. ज्योतिषी ॲस्ट्रो परदुमन यांच्या मते, हे यंत्र अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धन यांच्यातील सुसंवादाचा वस्तुपाठ निर्माण करेल.
आजच्या युगात, लोक बाह्य प्रदूषणानेच नव्हे तर मानसिक प्रदूषणानेही ग्रस्त आहेत, ज्यामुळे नकारात्मक कृती-घटना घडतात तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अशा पवित्र स्थळामुळे सकारात्मकता निर्माण होते आणि मन आणि परिसर शुद्ध होण्यास मदत होते. हे स्थान २६ वर्षांपासून रुद्राभिषेक विधींचे केंद्र आहे.