संगमनेर : शहरातील मालदाड रस्त्यावरील शिवाजीनगर येथील अंबादास शांताराम शिंदे यास गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास केली आहे. यावेळी पोलिसांनी गांजाही जप्त केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंबादास शिंदे पानटपरीत गांजा विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली. त्यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, विशाल कर्पे, आत्माराम पवार यांनी टपरीवर छापा घातला. यावेळी ७५० ग्रॅम वजनाची काळपट व हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया आणि सुकलेला गांजा मिळून आला.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अंबादास शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यास पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.