भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने दुबईला रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात हे विजेतेपद जिंकले आहे. तब्बल १२ वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.
यापूर्वी भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होकी. भारताने एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तर गेल्या वर्षभरातील हे भारताचे एकूण दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. याआधी जून २०२४ मध्ये भारताने रोहितच्याच नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.
या विजयाचा आनंद देशभरात साजरा केला जात आहे. अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत भारतीय संघाच्या यशाचे सेलीब्रेशन केले जात आहे. अशात भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरही मागे राहिले नाहीत. ७५ वर्षीय गावसकरांनी चक्क लहान मुलांसारखा मैदानात ठेका धरला होता.
भारतीय संघाला ज्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान केली जात होती आणि संघ पोडियमवर सेलीब्रेशन करत होता, त्यावेळी समालोचक असलेले गावसकर मैदानात बाजूला आनंदाने उड्या मारत नाचत होते. विजयाचा आनंद इतका झाला होता की ते वयही विसरून भारावून नाचत होते. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून डॅरिल मिचेल (६३) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांनी अर्धशतके केली. भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर २५२ धावांचे लक्ष्य भारताने ४९ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने ४८ धावा केल्या. याशिवाय इतर फलंदाजांनीही छोटेखानी खेळी करत भारताच्या विजयात योगदान दिले. न्यूझीलंडकडून मिचेल सँटेनर आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.