Rohit Sharma on Retirement: रोहित शर्मा पत्रकार परिषदेत आला अन् भविष्याबाबत भाष्य करून गेला; निवृत्तीवर नेमकं त्याने काय म्हटले?
esakal March 10, 2025 08:45 AM

ROHIT SHARMA ON RETIRING FROM ODIs : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली गेली होती. तशा अफवाही पसरल्या होत्या. रोहितचं वय पाहता तो २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार नाही, असे म्हटले गेले. पण, रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा दुष्काळ संपवला आणि या अफवांवर भाष्यही केलं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत आर अश्विन रोहितसोबत पत्रकार परिषदेत येऊन निवृत्तीची घोषणा करून गेला होता. रोहित जेव्हा पत्रकार परिषदेत आला, तेव्हा सर्वांना हेच वाटले होते. पण, रोहितने त्याच्या भविष्याबद्दल मोठं भाष्य केलं आहे.

न्यूझीलंडच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ७६) व शुभमन गिल ( ३१) यांनी १०५ धावांची सलामी दिली. श्रेयस अय्यर ( ४८), अक्षर पटेल ( २९) यांनी ७५ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर लोकेश राहुल ( ३४*) व हार्दिक पांड्या ( १८) यांच्या ३८ धावांच्या भागीदारीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. रवींद्र जडेजाने विजयी चौकार खेचला. भारताने ६ बाद २५४ धावा करून विजय मिळवला.

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला: प्रत्येकाने योगदान देणं खूप महत्त्वाचं असतं. ज्याला संधी मिळाली, त्याने प्रदर्शन केलं. अशा वातावरणात विजयाची सवय लागते आणि यशाची पुनरावृत्ती होते. हा विजय संपूर्ण संघाने मिळवलेला आहे. केएल राहुलवर दडपणाचा फारसा प्रभाव पडत नाही. या स्पर्धेत त्याने ज्या प्रकारे स्वतःला जुळवून घेतलं आणि यश मिळवलं, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. तो संघात असताना ड्रेसिंग रूममध्ये शांतता असते.

आज मी काही वेगळं केलं नाही. मला माहित होतं की ही खेळपट्टी अवघड आहे, आणि आक्रमक खेळ हाच माझा सर्वोत्तम मार्ग असेल. मी सातत्याने मोठ्या धावा काढू शकत नसलो, तरीही त्यात काही गैर वाटत नाही, कारण त्यामुळे मला संघासाठी योगदान देण्याची संधी मिळते. आजचा दिवस खास समाधान देणारा आहे, असे रोहितने त्याच्या टीकाकारांना सुनावले.

वन डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांवर रोहित म्हणाला, भविष्याचा काही प्लॅन नाही केलाय, जे सुरूय ते तसंच सुरू राहणार आहे. मी वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत नाही. मी कुठेही जात नाही. त्यामुळे आणखी अफवा पसरवू नका. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मी खूप धावा केल्या, परंतु संघ विजय मिळवू न शकल्याने, मजा नाही आली. संघ जिंकतो आणि जेव्हा त्यात तुमचा हातभार असतो, त्याने खूप समाधान मिळते.

रोहित शर्माने १८ वर्षांपूर्वी २००७ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतीय संघाने अलीकडेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकला. यापूर्वी, रोहित शर्मा २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता . रोहित शर्माने २६४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये रोहित शर्माने ४८.६४ च्या सरासरीने आणि ९२.८१ च्या स्ट्राईक रेटने ११०९२ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये रोहितची सर्वोत्तम धावसंख्या २६४ आहे. ३२ शतकांव्यतिरिक्त, रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये ५७ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं नावावर असलेला रोहित हा जगातील एकमेव फलंदाज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.