देगलूर - शहरातील पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने स्वतःच्या ओढणीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देगलूर रस्त्यावरील सिद्धेश्वर मंगल कार्यालयासमोरील शेतात मंगळवार ता. ११ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. आर्थिक विवंचनेतुन की कौटुंबिक वादातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले की काय याबाबत चर्चा केली जात आहे.
शहरातील भोईगल्ली भागात चंद्रकांत गंगाराम होनलवाड (वय-६२) हे मजुरी करून उपजीविका भागवितात त्यांना दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. सुनिता चंद्रकांत होनलवाड ही त्यांची तिसरी मुलगी (वय-२४) ही देगलूर महाविद्यालयातून बी. ए. ची डिग्री पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती.
सोमवारी ता. १० रोजी दुपारी सुनिता होनलवाड कपडे खरेदी करतो म्हणून घरातून बाहेर पडली. दिवसभर व रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे घरच्यांनी नातेवाईकासह इतरत्र शोध घेतला मात्र ती कुठेही मिळून आली नाही .मंगळवारी ता.११ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या नजरेत ही घटना दिसून आली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. सुनिता होनलवाडचा मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यासाठी आणण्यात आला. शिवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे करीत असल्याचे सांगण्यात आले.