Nagpur Crime : सासुला घरात बांधून पळविले दागिने; कटात सून आणि मित्राचाही सहभाग, कळमना भागातील घटना
esakal March 12, 2025 08:45 PM

नागपूर : मित्राच्या मदतीने सुनेने सासूला घरात बांधून ठेवले. एवढेच नाही तर तिला मारहाणही करून ३ लाख रोख आणि दागिने घेऊन पळ काढला. मात्र अवघ्या काही तासांतच पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावला.

सुनेनेच हा कट रचल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. ही घटना कळमना भागात उघडकीस आली. धरमनगरातील गीता यांना एक मुलगा असून त्यांचे लग्न झाले आहे. पती आणि मुलगा दोघेही खासगी काम करतात. त्यांचे दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर मुलगा आणि सून राहाते तर खाली फिर्यादी गीता पतीसोबत राहतात.

सोमवारी गीताचे पती आणि मुलगा कामाला गेले होते. घरात गीता आणि त्यांची सून राहात होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास तरुण-तरुणी तेथे आले. त्यांनी आधी सुनेला वरच्या माळ्यावर बांधून ठेवले नंतर खाली गीताचे तोंड दाबून ओढणीने बांधले. नंतर कपाटातील दागिने, रोख रक्कम असा पाच लाखांचा मुद्देमाल पळविला. आरोपी पळून गेल्यानंतर गीताच्या सुनेने स्वतःची सुटका केली नंतर सासूलाही सोडविले. याची माहिती मिळताच पोलिस पोहोचले.

गीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेतन कदम कळमना ठाण्यात पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीचे वाहन सीसीटीव्हीत कैद झाले होते. वाहन क्रमांकावरून तीन तासांत शोध घेतला.

चौकशी करून आरोपीकडून तीन लाख रोख, सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. घटनेमुळे गीताचे पती आणि मुलगा यांना धक्का बसला असून ते चिंतेत आहेत.

सुनेचा असा झाला भांडाफोड

चोरटे ज्या वाहनाने आले ते सीसीटीव्हीत कैद झाले. नंबर प्लेटवरून आरोपींची माहिती मिळाली. चौकशीत या घटनेची मुख्य सूत्रधार गीताची सून असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने स्वतःलाही बांधून ठेवल्याचा बनाव केला. सून आणि तिचा मित्र यांनी मिळून चोरीचा कट रचला. हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर सासूच्या पायाखालची वाळू सरकली. पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा छडा लावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.