टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. त्यानंतर 9 जूनला अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक सामना जिंकला आहे. स्वत: आयसीसीनेच याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल फेब्रुवारी महिन्यासाठीचा ‘प्लेअर ऑफ द मन्थ’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. आयसीसीने या पुरस्कारासाठी एकूण 3 खेळाडूंना नामांकन दिलं होतं.
शुबमनने दोघांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. आयसीसीने या पुरस्कारासाठी शुबमनसह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स यांनाही नामांकन दिलं होतं. मात्र शुबमनने या दोघांना धोबीपछाड देत हा पुरस्कार जिंकला. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
आयसीसी दर महिन्यात या पुरस्कारासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 खेळाडूंना नामांकन देतं. त्यानुसार आयसीसीने फेब्रुवारी महिन्यासाठी या तिघांना नामांकन दिलं. शुबमनने या फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली.
शुबमनने फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरूद्धच्या 3 सामन्यांसह एकूण 5 एकदिवसीय सामने खेळले. या 5 सामन्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील 2 सामन्यांचा समावेश आहे. शुबमनने अशाप्रकारे 5 सामन्यांमध्ये 101.50 च्या सरासरीने आणि 94.19 च्या स्ट्राईक रेटने 406 धावा केल्या. शुबमनने इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं. शुबमनने नागपुरात 87, कटकमध्ये 60 आणि अहमदाबादमध्ये 112 धावांची खेळी केली. शुबमनने त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशविरुद्ध 101 धावांची शतकी खेळी केली. तर पाकिस्तानविरुद्ध 46 धावा केल्या होत्या.
शुबमन गिल ‘प्लेअर ऑफ द मन्थ’आय
दरम्यान शुबमनने हा पुरस्कार जिंकण्यासह इतिहास घडवला आहे. शुबमन सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमची बरोबरी केली. शुबमनची पुरस्कार जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. शुबमनने याआधी 2023 या वर्षात जानेवारी आणि सप्टेंबर महिन्यात पुरस्कार जिंकला होता.