अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपो बलात्कार प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज न्यायालयाने दत्ता गाडेला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी दत्ता गाडेच्या नावावर आणखी ३ कलमांची वाढ केली आहे. पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने २ वेळा संभोग करणे अशा गंभीर स्वरुपाच्या कलमांची वाढ पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अडचणी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट एसटी बस डेपो बलात्कार प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२), ११५ (२) आणि १२७ (२) या कलमांची वाढ केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे घटनेच्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त करुन क्राइम लॅबकडे पाठवले होते.
आज दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्याला पुणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान शोधमोहिमेनंतरही दत्तात्रय गाडेचा मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती समोर आली आहे.