मंचर - आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यांतील ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी (ता. ११) मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, जलसंपदा खात्याचे अधिकारी व डिंभे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, 'आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यांतील घोड व मीना आदि नद्यांवर ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. बंधाऱ्यात पाण्याची गरज आहे. याभागात दुध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संकरित गायींसाठी मका व गवतासाठी पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याने बंधारे भरण्यात येणार आहेत.
आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यांतील बंधाऱ्यांचे पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्याचा निर्णय विखे पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पाण्याचा लाभ मिळेल. शेती सुजलाम-सुफलाम होईल, पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.'