आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापी सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक दिली. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकारातून काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द या घोषणांनी आझाद मैदान दणाणून सोडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वड्डेटीवार, आमदार कैलास पाटील, प्रविण स्वामी, दिलीप सोपल, सचिन अहिर, राजेश विटेकर, राजू नवघरे, अरुण लाड, जयंत आसगावकर,माजी खासदार राजू शेट्टी, आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाडगे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गिरीश फोंडे, उपस्थित होते.
अंबादास दानवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातील एका भाषणातील व्हिडीओ क्लिप ऐकवली. शक्तीपीठ रद्द करणार असे ते जाहीर भाषणात म्हणाले होते. मग आता तो रद्द होत नाही म्हणजे फडणवीस तुमचं ऐकत नाही असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.जयंत पाटील म्हणाले, एकाही शेतकऱ्याची मागणी नसताना सरकार हा रस्ता करत आहे. राज्यात असे अनेक रस्ते आहेत ते मागणी नसताना होत आहेत हा चमत्कार आहे. पक्षनिधी उभा करण्यासाठी सरकारने हा नवा मार्ग अवलंबला आहे. कंत्राटदार यांना पोसण्याची ही नवी साखळी आहे, ठराविक सहा जणांना कामे दिली जातात याचा भुर्दंड आपल्या सर्वांवर बसत आहे. तुम्ही शेतकरी याला विरोध करणार असाल तरच आम्ही यात पुढाकार घेतो. यावेळी उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी जयंत पाटील यांना समर्थन देत शक्तीपीठ महामार्ग विराधात जोरदार घोषणा दिल्या.
आमदार सतेज पाटील म्हणाले, कुणाचे तरी वाळू सिमेंट खपवण्यासाठी हा महामार्ग कंत्राटदारांसाठी झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जो गरजेचा रस्ता आहे त्याला कोणी विरोध करत नाही मात्र हा रस्ता नको म्हणत असतानाही सरकार तो रेटत आहे. ठेकेदाराला हवे असणारे कामच हे सरकार करत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तीपीठ रद्द झाल्याची घोषणा केली पण आता त्यांना विसर पडला आहे. विधानसभेचे काँग्रेसचे गटनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, हे सरकार डबल ढोलकी सरकार आहे. खाण्यासाठी हे एकत्र येतात आणि लोकांचे हित पाहताना मात्र विराधाभास दाखवतात. सध्याचे सरकार टक्केवारीवर चालते. सध्या 9 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे. ज्यांनी पक्षांशी गद्दारी केली त्यांनी शेतकऱ्यांनाही फसवले.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग म्हणजे देवाची आळंदी सोडून चोराची आळंदी करता कशाला. ज्या ज्या ठिकाणी नव्या रस्त्यावर टोल उभारले आहेत त्यांची 25 टक्के सुद्धा वसुली होत नाही. आमदार विश्वजित कदम म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्याला विरोध केला जात असताना याची फिकीर नाही. जमीन मोजणी केली असेल तर त्या खुणा बुजवा, उपसून टाका असे आवाहन शेट्टी यांनी केले. हा रस्ता झाला तर कोल्हापूर जिल्ह्यात 40 दिवस पूर हटणार नाही.पूर्ण शेती पुराच्या पाण्यात जाणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.
लातूरला 8 एप्रिलला मेळावा
शक्तीपीठ महामार्गचा हा लढा पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या 8 एप्रिलला लातूर येथे भव्य मेळावा घेण्याचा निर्णय या मोर्चात घेण्यात आला. प्रत्येक जिल्यात मेळावे, स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्री यांना जाब विचारण्यासाठी घरावर मोर्चे काढणार, सरकार निर्णयाचा निषेध म्हणून शेतात काळे झेंडे लावणार असे निर्णय यावेळी घेण्यात आले.