Video: चॅम्पियन्स ट्रॉफीचा जल्लोष करणाऱ्यांचं पोलिसांनी केलं मुंडन! आमदार पवारांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न
esakal March 13, 2025 03:45 AM

Police Shave Heads of Champions Trophy Celebrators : नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत फायनल मॅच टीम इंडियानं जिंकल्यानं देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला होता. पण याच जल्लोषादरम्यान घडलेली एक धक्कादायक बाब सध्या समोर आली आहे. जल्लोष करणाऱ्या काही तरुणांचं मुंडन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत.

ही घटना घडली आहे मध्य प्रदेशातील देवास इथं. या ठिकाणी भारतानं अंतिम सामना जिंकल्यानंतर तरुणांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. यावेळी चिडलेल्या पोलीस अधिकाऱ्यानं या तरुणांची चक्क चंपीच केली. तसंच त्यांची रस्त्यावरुन वरातही काढली. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पण हा संतापजनक प्रकार असल्याचं सांगत स्थानिक आमदार गायत्रीराजे पवार यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस आधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारला.

नेमकं काय घडलं?

रविवारी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं विजय मिळवल्यानंतर देवास शहरात तरुणांनी शहरातील एबी रोडवर उतरुन मोठा जल्लोष केला. इथल्या सयाजी द्वार इथं मोठ्या प्रमाणावर लोक गोळा झाले होते आणि फटाके फोडत होते. ज्यामुळं काही गंभीर घटना घडू शकली असती. यामुळं रहदारी आणि रस्त्यावरील वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. काही तरुण या ठिकाणी बेजाबदारपणे फटाके फोडत होते.

यामुळं मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळं याची खबर कळताच जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी अजय सिंह गुर्जर यांनी या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. या तरुणांनी अधिकाऱ्यांचं ऐकलं नाही, उलट त्यांच्याशी गैरवर्तन करायला लागले. त्यानंतर संतापलेल्या काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कशीतरी या अधिकाऱ्यांनी आपली गाडी त्यांच्या तावडीतून बाहेर काढली.

डोकं भादरुन काढली वरात

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी या धुडगूस घालणाऱ्या तरुणांचा शोध घेतला त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि सोमवारी रात्री त्यांचं डोकं भादरुन त्यांची एमजी रोडवरुन वरात काढली. यावेळी लाज वाटत असल्यानं हे तरुण आपला चेहरा लपवताना दिसत होते.

विधानसभेत उपस्थित केला मुद्दा

दरम्यान, देवासच्या आमदार गायत्रीराजे पवार यांनी हा मुद्दा मध्य प्रदेशच्या विधानसभेत उपस्थित केला. भारत जिंकल्याचा आनंद साजरा करणाऱ्या तरुणांवर अशा प्रकारची कारवाई करणं हे निंदणीय कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.