-राजू नरवडे
संगमनेर : पिंपरणे (ता. संगमनेर) येथील कमलाबाई राजपूत या महिलेच्या झोपडीला आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यामुळे या महिलेवर उघड्यावर राहण्याची वेळ आली होती; मात्र गावातील सकाळ व्यायाम ग्रुपच्या सदस्यांसह काही नागरिकांनी एकत्र येत महिलेला पत्र्याचे घर बांधून दिले आहे.
पिंपरणे गावांतर्गत असलेल्या मळईवस्ती शिवारात कमलाबाई राजपूत या रहात असून, मोलमजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी रात्री झोपडीला आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. जळालेल्या झोपडीची दुरुस्ती कशी करायची हा मोठा पेच कमलाबाई यांच्या पुढे होता. त्यांच्या हक्काचा निवारा करून देण्याचे सकाळ व्यायाम ग्रुपसह काही नागरिकांनी ठरवले. यानंतर थोडे-थोडे पैसे काढून कमलाबाई यांना हक्काचे पत्र्याचे घर बांधून दिले.
झोपडी जळाल्याने सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. मात्र, अशा कठीण परिस्थितीत कुठे जायचे, असा प्रश्न होता, अशा वेळी गावातील नागरिक माझ्यासाठी देवदूत म्हणून धावून आले. मला पत्र्याचे घर बांधून दिले. आनंदाने भारावून गेले आहे.
- कमलाबाई राजपूत, पिंपरणे