BJP MLA: भाजप आमदारानं एजंट बॉम्ब फोडला, विधानसभेत प्रश्न न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार; धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल
Saam TV March 13, 2025 09:45 PM

विधानसभेत प्रश्न न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. १२ मार्चला फुके यांनी विधान परिषदेत बोलताना एजंट बॉम्ब फोडला आहे. त्यांनी या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये विधानसभेत प्रश्न का लावायचा नाही, प्रश्न लावल्यावर काय होईल, यासंदर्भातील धमक्या ऐकायला मिळत आहे. फुकेंनी फोडलेल्या एजंट बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

या प्रकरणात विरोधीपक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ कार्यकर्ते सहभागी असल्याचा खुलासाही फुके यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील फुकेंनी केली आहे. तसेच ऑडिओ क्लिप यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

विधानपरिषदेत परिणय फुके म्हणाले, '२०२३ साली तत्कालीन मंत्र्यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. मी यावेळीस प्रामुख्यानं ३-४ राईस मिलसंदर्भात माहिती देतोय. या कारखान्यांना घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये क्लीन चिट देण्यात आलीय. काल यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हा प्रश्न मांडण्याच्या २ दिवस आधीची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे.'

देवेंद्र फडणवीसांकडे ऑडिओ क्लिप सोपवली

'काही एजंट्स राईस मिलच्या कार्यालयात गेले होते. तिथे यासंदर्भातील प्रश्न विधानसभेत लावायाचा नाही, जर प्रश्न मांडले तर काय होईल, अशा धमक्या देण्यात आल्याचा व्हिडिओ क्लिप देखील माझ्याकडे आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्या आहेत', असं फुके म्हणालेत.

परिणय फुकेंनी एजंट बॉम्ब फोडल्यानंतर ऑडिओ क्लिपचीही फॅारेन्सीक चौकशी होईल, तसेच पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती फुके यांनी दिली आहे. तसेच तो नेता कोण, त्या नेत्याचं नाव जाहीर करणार असल्याचंही परिणय फुके म्हणालेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.