Crime News : इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आलेल्या ब्रिटीश तरुणीवर दोघांनी केला बलात्कार
esakal March 13, 2025 11:45 PM

Foreigner Girl Raped by Boyfriend In Delhi : बॉयफ्रेंडला भेटायला दिल्लीत आलेल्या ब्रिटीश तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रानेच या तरुणीवर अत्याचार केल्याची माहिती आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली.

मीडिया रिपोर्टनुसार, कैलाश आणि वसीम असं दोन्ही आरोपींचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पीडित तरुणीची ओळख आरोपी कैलाशशी झाली होती. ते सातत्याने ऐकमेंकांना मेसेज करत होते. काही दिवसांतच त्याच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

दरम्यान, ही तरुणी महाराष्ट्र आणि गोवा फिरण्यासाठी भारतात आली. त्यावेळी तिने कैलाशला फोन केला. मात्र, आपण गोव्यात येऊ शकत नसल्याचं त्याने सांगितलं. तसेच तिला दिल्ली येण्याची विनंती केली. त्याच्या विनंतीनुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचली. तसेच महिपालपूरमधील एका हॉटेलमध्ये थांबली.

दिल्लीत आल्यानंतर तिने कैलाशला परत फोन केला आणि हॉटेलमध्ये भेटण्यास बोलवलं. तेव्हा आरोपी कैलाश आणि त्याचा मित्र वसीम दोघेही तिला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

याप्रकरणी तरुणीने वसतंकुंज ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच याची माहिती दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्त कार्यलायाला देण्यात आली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.