Uttar Pradesh : महाकुंभमधल्या 'त्या' नाविकाला भरावा लागणार १२ कोटींचा इन्कम टॅक्स, CM योगींनी केलेलं कौतुक पडलं महागात
esakal March 13, 2025 11:45 PM

Boatman Earns Rs 30 Crore at Maha Kumbh : प्रयागराजमध्ये नुकताच झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान एका नाविकाने ३० कोटी रुपये कमावल्याचे दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता. तसेच त्यांनी विधानसभेत बोलताना या नाविकाचं कौतुकही केलं आहे. मात्र, हे कौतुक नाविकाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कारण आता आयकर विभागाने त्याला नोटीस बजावली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रयागराजच्या अरैल गावात पिटू नावाच्या नाविकाला आयकर विभागाने १२ कोटी रुपयाची नोटीस बजावली आहे. कुंभमेळ्यात झालेल्या ३० कोटींच्या कमाईबाबत ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यानाथ यांनी कौतुक केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

आकर विभागाने १९६१ च्या कायद्याच्या कलम ४ नुसार या नाविकाला १२ कोटी रुपये भरण्यास सांगितलं आहे. आयकर विभागाच्या नोटीसनंतर आयकर कायद्याबाबत अनेक चर्चा सुर झाल्या आहेत. अनेकांनी हा कायदा बदलण्याची मागणी केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या दाव्यानुसार, या नाविकाने कुंभमेळ्यात ४५दिवसांत ३० कोटी रुपये कमावले आहेत. या कुंभमेळ्यात १३० जहाजं चालवणाऱ्या कुटुंबाने ३० कोटी रुपये कमावले आहेत. याचा अर्थ रोज ५० ते ५२ हजार रुपयांची कमाई त्यांनी केली आहे. कुंभमेळ्यादरम्यान त्यांची कमाई कित्येक पटीने वाढली आहे, अशी प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.