आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आटोपली. भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. त्यानंतर आता जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत असा लौकीक असलेल्या आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत देश-परदेशातील कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडू सहभागी होतात. आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झालीय. तर आतापर्यंत यशस्वीरित्या 17 व्या मोसमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या इतिहासात असे 4 खेळाडू आहेत, जे सुरुवातीपासून ते 2024 पर्यंत प्रत्येक हंगामात खेळले आहेत. तसेच यंदाही 18 व्या मोसमात खेळण्यासाठी सज्ज आहेत. ते चौघे कोण आहेत? त्यांच्याबाबत जाणून घेऊयात.
आयपीएल18 वा मोसम 4 खेळाडूंसाठी खास असणार आहे. यंदा हे खेळाडू सलग 18 व्या मोसमात खेळणार आहेत. या चौघांमध्ये 1 खेळाडू तर असा आहे जो सुरुवातीपासून एकाच संघासह आहे. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चँलेजर्स बंगळुरुकडून खेळतोय. विराटचा हा आरसीबीसाठी 18 वा मोसम असणार आहे. तसेच विराट व्यतिरिक्त महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि मनीष पांडे हे तिघेही पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. तसेच यंदाही खेळणार आहेत.
विराट कोहलीची लोकप्रियता किती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. विराटने आयपीएलमध्ये आरसीबीचं प्रतिनिधित्व करण्यासह नेतृत्वही केलं आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहली याच्याच नावावर आहे. तसेच विराटच्या नावावर इतरही विक्रम आहेत.
तसेच महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा हे दोघे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल चॅम्पियन केलं होतं. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने 2023 साली चेन्नईला पाचव्यांचा चॅम्पियन केलं आणि रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याआधी चेन्नईने 2010, 2011, 2018 आणि 2021 साली ट्रॉफी उंचावली होती.
मनीष पांडे याने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 8 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. मनीष यंदा कोलकाता टीमकडून खेळणार आहे. मनीष हा स्फोटक फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. मनीषने 2009 साली बंगळुरुविरुद्ध केलेली खेळी अद्याप प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात आहे.