पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं नुकतंच आयोजन केलं होतं. हायब्रिड मॉडेलवर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. आता पाकिस्तान पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धा आयोजन करण्यात गुंतला आहे. कारण आयसीसीने वुमन्स वनडे वर्ल्डकप पात्रतेसाठी वेळापत्रक जाहीर केलं आहे. 14 मार्चला आयसीसीने हे वेळापत्रक जाहीर केलं आहे. वेळापत्रकानुसार सर्व सामना लाहोरमध्ये होणार असून ही स्पर्धा 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. सहापैकी दोन संघ भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरतील. ही स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आणि यजमान भारत आधीच पात्र ठरला आहे. एकूण 8 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. त्यामुळे दोन संघांसाठी पात्रता फेरीची स्पर्धा पार पडणार आहे.
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पात्र होण्यासाठी बांग्लादेश, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड आणि थायलंड यांच्यात लढत होणार आहे. आयसीसी वुमन्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बांग्लादेश, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज हे चार संघ सातव्यापासून दहाव्या स्थानावर होते. त्यामुळे त्यांना थेट एन्ट्री मिळाली नाही. आता पात्र होण्यासाठी स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरीकडे थायलंड आणि स्कॉटलंडने 28 ऑक्टोबर 2024 जाहीर केलेल्या आयसीसी वनडे रँकिंगमध्ये स्थान मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना आयसीसी पात्रता फेरीत स्थान दिलं आहे. आता या सहापैकी कोणते दोन संघ एन्ट्री मारणार याबाबत उत्सुकता आहे.