पुणे - पुणे आणि परिसरात हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी कमाल तापमानात वाढ झाली. त्यामुळे पुणे आणि परिसरातील उष्णतेचा पारा वाढला होता.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात घट होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात आणखी घट होईल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत ४० अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली. त्यात शनिवारी (ता. १०) घट होऊन ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांनंतर कमाल तापमानात घट होऊन ३६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल.
परिणामी उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुणे आणि परिसरात पुढील पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. १६) कमाल तापमानात एकाने घट होऊन ३७ अंश सेल्सिअस; तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १९) कमाल तापमानामध्ये आणखी घट होऊन ३६ अंश सेल्सिअस; तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.