पुणे - स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचा वकील साहिल डोंगरे हे मारहाणीत जखमी झालेले नाहीत. तर दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.
साहिल डोंगरे यांनी मंगळवारी (ता. १८) हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. १७ मार्च रोजी मध्यरात्री काहीजणांनी हडपसर येथील गाडीतळ परिसरातून त्यांचे अपहरण केले. गाडीत बसवून बेदम मारहाण करून दिवे घाटात सोडून दिले, असे तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल डोंगरे हे गाडीतळ येथील सागर बारमधून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मित्र अनिकेत मस्के समवेत बाहेर पडताना दिसत आहेत. मस्के बारमधून घरी गेल्याचे सांगत आहे.
सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डोंगरे हे १७ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आणि १८ मार्च रोजी दिवे घाट दुमेवाडी परिसरात असल्याचे दिसून आले. सासवड पोलिस ठाण्यातील अंमलदार यांना रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेल साईरूपजवळ एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला आहे. तो बेशुद्धावस्थेत असून मदत हवी आहे, असा कॉल प्राप्त झाला होता.
परंतु ते आगीच्या घटनेचा कॉल असल्यामुळे तेथे जाऊ शकले नाहीत. त्यानंतर सासवड येथील रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांकडे चौकशी केली असता, त्यांनाही कॉल आल्याने ते मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. परंतु त्यांना जखमी व्यक्ती आढळून आली नाही.
डोंगरे यांनी त्यांचा अपघात झाल्याचे पहाटे १०८ क्रमांकावर स्वतः कॉल करून सांगितले. सासवड येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील रुग्णवाहिकेतून जखमी डोंगरे यांना उपचारासाठी नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता डोंगरे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात त्यांचे अपहरण करून मारहाण झाल्याची तक्रार दिली. परंतु त्यांनी या उपचाराबाबत माहिती दिली नाही.
हडपसर पोलिसांनी डोंगरे यांना ससून रुग्णालयात दाखल केले. डोंगरे यांचे अपहरण झाले नसून, अपघातात जखमी झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील दत्तात्रेय गाडे याने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे स्वारगेट बसस्थानकाच्या आवारात शिवशाही बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. डोंगरे हे या प्रकरणातील आरोपी गाडेचे वकील आहेत.