Mahavikas Aghadi : विरोधी पक्षनेते पदासाठी मविआ प्रतीक्षेतच; अधिवेशन संपण्याच्या मार्गावर असतानाही निर्णय नाही
esakal March 20, 2025 07:45 AM

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अधिवेशनाचे मोजकेच दिवस उरले असले तरी अजूनही विरोधी पक्षनेत्याबाबत सत्ताधारी पक्षाकडून व विधानसभेच्या अध्यक्षांकडून निर्णय न झाल्याने महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रतीक्षेतच आहे.

पुढील ५ ते ६ दिवसांत यासंदर्भात निर्णय झाला नाही तर हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पी अधिवेशन अशी दोन अधिवेशने विरोधी पक्षनेतेपदाविना जाणार आहेत. विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात विरोधी पक्षनेते पदाचा चेंडू ढकलला गेला आहे. महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते पदासाठीची पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. यावर विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे.

पुरेसे संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला २० जागांच्या पुढे जाता आले नाही. जर विधानसभा अध्यक्षांनी ठरविले तरच विरोधकांना हे पद मिळू शकते, अशा चर्चा सुरू होत्या.

या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेते पद मिळणार का, असा सवाल उपस्थित होत असताना विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी कोणतीही खास तरतूद नसल्याचे उत्तर विधिमंडळ सचिवांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना दिले. विरोधी पक्षनेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता तरी विरोधी पक्षनेत्याची निवड होणार की हे अधिवेशनदेखील विरोधी पक्षनेत्याशिवाय पूर्ण होणार, हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

राज्यातील विधानसभा विरोधी पक्षनेत्याचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अधिवेशनाचे काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे, मात्र अजूनही त्यावर कोणता निर्णय झालेला नाही.

आम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी अत्यंत आशावादी आहोत. अधिवेशन सुरू झाल्यापासून लवकरच विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होईल, असे आम्हाला वाटत होते. मात्र अजून तरी घोषणा झालेली नाही. आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना वारंवार भेटून  विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करण्यासंदर्भात विनंती केली आहे.

- भास्कर जाधव, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार

ठाकरेंच्या पक्षाची ‘फिल्डिंग’

विधानसभा अध्यक्षांना ४ मार्च रोजी यांना पत्र देऊन विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी गटनेते भास्कर जाधव यांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच या दोन आठवड्यांमध्ये दोन वेळेस भास्कर जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची दोन वेळेस भेट घेऊन विरोधी पक्षनेते पदासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.