मॅडम : नमस्कार,
होय! होय! बरोबरच आहे!
खरकटं! असंच नाव आहे आजच्या या परिसंवादाचं!
आमची संस्था नेहमी काईतरी नवंच करते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यासाठी आग्रही असतात. तर, खरकटं! खरकटं म्हंजे सांडलेलं! पन जरी सांडलं असलं, तरी होतं ताटातलंच. तर समाजात जे जे सांडलेलंय, बाहेर पडलेलंय त्याच्याबद्दल बोलायचंय. त्याचं एवढं वावडं का? ताटाबाहेर काढनारे तुम्हीच आनि बाहेर काढायचे नियम पन तुमचेच.
श्शीऽऽ! घृना येते मला. हलगर्जीपनानं नियम करून तुम्ही आजवर कुनालाही ह्याच्याबाहेर, त्याच्याबाहेर ढकलत राहिलात. ताटातलं बाहेर सांडन्याचा उद्योग सांगितला कुनी तुम्हाला? समजता कोन स्वतःला? अस्सं कानफाट फोडील ना... तुडवून काढील एकेकाला…
एक : मॅडम… मॅडम... पानी प्या… पानी प्या..!
मॅडम : (पाणी पिऊन) … थॅंक्स सर! आजकाल हे असं होतं. एन्ग्झाईटी ट्रीगर होते अचानक! सुच्येनासं होतं!
दोन : खूप हिंसक आहे हो पन हे. जपा जरा. मला भेटा नंतर. माझा चुलतभाऊ सायकॅश्ट्रीक्ट आहे.
तीन : हॅहॅहॅ सांडलं पहा यांनी खरकटं! हॅहॅहॅ
चार : आयेम रिअली स्वारी पन मी समजलो नाही. सरांनी तर मदत देऊ केली. म्हंजे एकापरीनं आपलं म्हनलं मॅडमला. म्हंजे वाढून घेतलं जास्तीचं. सांडलं काय त्यांनी ?
तीन : वशिलेबाजी केली! पण लक्षणीय हे आहे की माणूस सदासर्वकाळ सांडत राहतो. त्याला एकसंध, भरीव ठेवण्यासाठी नाना यत्न झाले आहेत, होत आहेत आणि पुढेही होत राहतील पण जे खळ आहे केवळ त्याचीच नव्हे तर अवखळाचीही व्यंकटी सांडणारच! कारण व्यंकटी जन्मखूण आहे. जन्मजात आहे. सांडूनही पुनःपुनः भरत राहणार. तर त्या सांडलेल्याला सामावून घ्यायचं. वा! स्तुत्य विचार आहे.
पाच : (सहाच्या कानात) ह्या असल्या बोलन्यानंच कवट्या गरम हुत्यात, आपली तं व्यंकटी उतू जातीच्जाती. समोरच्याची बी सांडावी वाटती. बीपी शूट होतय ओ. नीट समद्याना कळेल आसं बोललं तं काय विद्यापिठातून डिच्चू देनारे का कुणी ह्यांन्ला?
सहा : खर्कट्यावर्नं मले तं एकदम तो बंकटलाल का कोन, तोच आटवला. गजानन म्हाराजांच्या पोथीतला ओ. म्हाराज तितं शेगावले, खर्कटं तं कै नै बोवा पन तसलंच बाहेर फेकलेलं खाऊन राहिले. तर ते हा पाहून ऱ्हाईला. आनि व्यथितच होऊन गेला होतां ना ओ तो!
मॅडम : सर, सर, आपण मदी बोलू नका. सगळ्यांना टाईम भेटनारे. आज नं आपन जानीवपूर्वक खरकटं चिवडायचंय. व्यथा मांडायचीय. तर या चर्चेसाठी आपण समाजातले विविध उपेक्षित मान्यवर बोलावले आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी आपली आवस्था मांडावी. टीचर पासून सुरू करू. येस सर…
टीचर : नमस्कार, मी मराठवाड्यातील डेंजर डिश्ट्रीक्ट A K A बीड मदूनच आलोय. AKA म्हंजे आका नाय बर्का ! हॅहॅहॅहॅ ! जस् जोकींग हा! हॅहॅहॅहॅ ! आसं सुरुवातीलाच बोल्लं का बोवा लोकं टरकून ऱ्हात्यात. हॅहॅहॅहॅ ! जस् जोकींग हा! हॅहॅहॅहॅ ! पन खरं सांगतो चांगले लोक पन आहेत आमच्याकडं.
मी बरंका सोशल सायन्स शिकिवतो हायस्कूल ला. आनि ट्यूशन पन घेतो नुसतं सायन्स आनि मॅथच्या. तर मी बगतो ना, की एकोपा वाढत आहे. म्हंजे आपापल्या जातीला धरून ऱ्हान्याचा ट्रेंडे. तर विद्यार्थी हे जातीचे गट धरून ऱ्हातेत. दुसऱ्या जातीच्या सगळ्यांना डायरेक पान्यात पाहतेत.
दुसरं म्हंजे आता मोबाईल, ओटीटी मुळं पोरांला ॲक्शनचं ॲट्रेक्शन वाढाय लागलंय. राजकारनात जाने, फॅालोअरची टोळी बनवने, चॅलेंज देने, घेने, गोल्डमॅन होने, दहशत तयार करने हे नवे कॅरीयर ऑप्शनपन त्यातूनच त्यान्ला जास्त फ्रुटफुल वाटाय लाग्लेत. कारन तिथं ॲक्शने.
दुसरं म्हंजे, आता काय होतंय की शाळेत संस्कार करायचे तर कुनी करायचे हा प्रश्नय. कारन मेनली संस्काराचं काम ह्ये ईन्श्ष्टा, वॅाटस्प, फेसबुक ह्येच परस्पर करतेत. त्यात लुडबुड करन्याची शिक्षकापाशी डेरींग नस्ती. त्ये ट्युशन मदी बिजी आस्तेत. उगा कुना पोराला हाटकलं तं त्याचा बाप कोन ना कोन आस्तोचे. त्या बापाचा पुना कोन तरी आका आस्तोय.
आता आका म्हंजे आकाच म्हनलोय बरंका. हॅहॅहॅहॅ! जस् जोकींग हा! हॅहॅहॅहॅ ! मंग उगा मुका मार बसन्यापरीस त्ये गप ऱ्हातंय. पुना काय होतंय की शिक्षकांला पगारी चांगल्याएत, पुना घरटी जर एकाला दुसरा शिक्षक आस्ला तर टॅक्स वाचवायला सावकारीच करावी लागती. ट्युशनची जमा होनारी कॅश फिरवायला पन सावकारी सार्का बेश्ट साईड बिजनेस नाही.
म्हंजे घरगुती स्मॅाल फाईनान्स. त्यात रिस्क भरपूर आस्ती पन रिटनपन चांगले येतेत. वसुलीसाठी फक्त थोडं लेबर लागतं. हाताशी चार पोरं ठेवावी लागतेतच. शिक्षकाला ते लेबर आयतंच मिळतं. आपल्या विद्यार्थ्यांन्ला शिकत आस्तानाच उत्पन्नाचं साधन देता येतं. श्टायपेंड टाईप. पोरगं पॅाकेट मनी कमवाय लागल्यामुळं पालकांचा पन ट्युशनकडं ओढा ऱ्हातो.
कोविडच्या टायमाला माजे लई अडकले होते पैशे तर आपल्या ट्युशनच्या माजी विद्यार्थ्यांनी व्याजासकट वसुली करून दिली. ते काम करताना एकावर तर हाप मर्डरची केस लागली. मी म्हनलं मी वकील करतो. तर विद्यार्थी म्हनला, ‘‘ नको सर. तुमी संदी दिली हेच खूपे. तसंबी हर्सूल जेलला जाऊन यायचं माजं ड्रीमच होतं.’
तं म्हनलं की बाबा जामीन करू का? तं म्हनला, ‘नको सर, माज्या आकांची टीमचे वकिलांची.’’ आशे चांगले अनुभव पन येतात. आमच्या मराठवाड्यात आमी कुनालाच किंमत देत नाई सिवाय हमारे इलाकेके लोगोंको! हॅहॅहॅहॅ! आनि हे पूर्वापार चालत आलेलंय. निझाम टेरीटरी वेगळीच होती ना हो! महाराष्ट्राची ओरीजनल संस्कृती ही मराठवाड्याचीए.
म्हंजे गुर्माडपना, बेकायदेशीरपना ह्ये नाई आ! हॅहॅहॅहॅ! तर ज्ञानेश्वर, एकनाथ, वगैरे तसल्या मदली! पन आता काय झालंय की घरटी एक ज्ञानेश्वर झालाय! फरक येवडाचे की वरीजनल न्यानेश्वरानी दगड लावून घेतला बोलून झाल्यावर, पन ह्ये आपलंच खरं म्हनत ऱ्हातंय आनं दुसऱ्याच्या डोक्यात दगड टाकतंय.
हॅहॅहॅहॅ! जस् जोकींग हा! हॅहॅहॅहॅ ! शिक्षक म्हनून मान नसला तरी पोरांना पास बीस केलं, कॉप्या बिप्या दिल्या तर ती उपयोगी पडतेत. पालकांना स्मॅाल फायनॅन्स केला की ती लक्षात ठेवतेत. तर ह्ये लगीच त्यांचं बालगुन्हेगार म्हनून खरकटं करनार. मुख्य धारेतून बाहेर काडनार. इन्क्लुजिव राह्यला पायजेले. आहो आमच्या नाथांनी गाढवाला पन आपलं म्हनलं होतं. आनि तुमी मी फक्त ट्युशन घेतो म्हनून मला सस्पेंड करता ? शेम शेम!
मॅडम : कीती डायरेक्ट व्यथा मांडली सर तुम्ही. हे नियम, कायदा याचं जरा जास्तीच केलेलंय बरंका. अशानं हुकूमशाही सुरू होते. मला वाटतं जो तो मुक्त आहे आनि त्यामुळेच वाट्टेल ते बोलू शकतोय, करतोय. तर करू द्या ना. तुम्ही कोण त्यांना बाजूला काढणारे? खरकटं सांडणारे? समजता कोणं स्वतःला? अस्सं कानफाट फोडवंसं वाटतं ना... तुडवून काढावं एकेकाला…
एक : मॅडम… मॅडम... पानी प्या… पानी प्या..!
मॅडम : (पाणी पिऊन) थॅंक्स सर! पिल पन घेतेच. (गोळी घेतात) असो. एनाराय तुम्ही बोला.
एनाराय : ॲक्चुली मी आन्त्रप्रेनर आहे. एनाराय होतो. आठ वर्षं. मला वाटतं की सिस्टीममध्ये जे बेकायदेशीर आहे ते खरकटं आहे असं मानलं तर त्याला ॲक्सेप्ट करायलाच लागेल. मला पन वाटतं की आपल्या समाजाला कायद्याची बूज उरलेली नाही ही ओरड उगाच आहे. कारण पॅरलल सिस्टीम रुजल्या आहेत आणि इफिशियंट आहेत. मी इकडे येऊन वर्कशॅाप सेट केलं.
जागा जरा वांद्यातली होती त्यामुळे स्वस्तात मिळाली. कॉर्पोरेटरशी ओळख काढली. त्यानं रोख रक्कम घेतली पण त्यामुळे सगळं सुरळीत चाललंय. चक्क दोन शिफ्ट चालवतो मी. सुरुवातीला आवाज होतो वगैरे कंप्लेंटस जायच्या. पोलीस यायचे. मग कॉर्पोरेटरनी सोपं सोल्यूशन दिलं. म्हटला एके ठिकाणी पैसे द्या. लाईक वन विंडो स्कीम.
आता वेळच्यावेळी पैसे पोहोचले की तो सगळं बघतो. बिजनेस वाढवण्याकडे फोकस करता येतं. तिकडे अमेरिकेत म्हणजे जरा गाडी स्ट्रिप्सच्या बाहेर लागली तर लगेच काचेवर तिकीट! आपल्याकडे इतकी भारी सिस्टीम आहे. परवा माझ्याकडे स्क्रॅप चोरीला गेलं. मी सरळ पीएसायला पाकीट पाठवलं. तुम्हाला सांगतो माझं तर मिळालंच उलट थोडं जास्त मिळालं.
पाकिटाचा परतावा मिळाला. An entrepreneur needs returns on investment. ही इकोसिस्टिम मला आवडते. मी परदेशात असताना कंपनीची वेळ संपल्यानंतर दुसऱ्या एका कंपनीचं पार्ट टाईम काम करायचो तर मला टर्मिनेट केलं. कारण काय तर म्हणे त्यांचा लॅपटॉप वापरला ! Nonsense! मी म्हणतो…
प्राध्यापक : sorry हं, मला जरा जायचंय म्हणून मी पटकन जरा मध्येच बोलतो. हुहु! मला वाटतं की प्रत्येक नागरिकाला नव्या आर्थिक व्यवस्थेत अनेक विकल्प मिळाले आहेत. फ्रॅाड आणि स्कॅम करणाऱ्यांना सुद्धा आम्ही सत्तेत वाटा देत आहोत. नवी राजकीय व्यवस्था ही व्यावहारिक असल्याने देवघेवीतून विकास विकल्प उपलब्ध करून देते आहे.
भ्रष्टाचार म्हणून जे आम्ही सांडत होतो ते आता पानात आले आहे. टेक्नालॉजीने हरेकाला बोलायची संधी देऊन लोकशाही बळकट केली आहे. जातीय कळप बांधून एकोपा साधला जातो आहे. सर्वांनाच कायदेभंगात सहभागी होण्यासाठी प्रेरित करून आपण समता साधलेली आहे. हिहखक्! जरा जड होतंय का?
पाच : नाई, नाई! काही कळतच नाईय्ये. त्यामुळं जड आनं हलक्याचा सवालच नाई. खॅक् खॅक् खॅक्
प्राध्यापक : हिहखक्! हिहखक् ! बरोबर आहे तुमचं. आजवर अवघड, दुर्बोध बोलून आम्ही आमची व्याकरणाची सावकारी जपली. अशुद्ध बोलणाऱ्याला बाहेर काढलं. तंत्रज्ञानानं मात्र आमची कोठारंच फोडली. सगळ्याच गोष्टी गुगलोच्छिष्टात आल्या आहेत. अगदी विसंगत, व्याकरणदुष्ट, भुक्कड, छप्री बोलूनही पुढारी, पत्रकार, शिक्षक होता येतंय. किंबहुना तसं बोलल्यानच उत्कर्ष होतो आहे. तेव्हा योग्य व्याकरण आणि उच्चारणाचे आग्रह धरणे मूर्खपणाचे आहे.
मला वाटतं खरकट्या बरोबरच भुक्कड, दळभद्री आदि शब्दही आचरणाने सिद्ध करून पानात घेऊन आम्ही या ठिकानी , हिहखक्! काळाला अपोष्णि घातली आहे. हिहखक्! गेलो… त्या ठिकानी... हिहखक्!
मॅडम : (फोनवर) हॅलो साहेब ! हो साहेब! हो का साहेब? हो हो साहेब. आणि साहे… ओह! ठेवला. हुहुहु!
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, रसिकाग्रणी, माननीय आमदार साहेब आपल्या या परिसंवादात जातीनं सहभागी होणार होते पण सीएमनी मिटींग लावली म्हने अर्जंट आणि त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. हे कोन लोकेत? समजतात कोन स्वतःला? अस्सं कानफाट फोडवंसं वाटतं ना... तुडवून काढावं एकेकाला…
एक : मॅडम… मॅडम... पानी प्या… पानी प्या..!
मॅडम : (पाणी पिऊन) पिल पण उपयोगी पडत नाही हल्ली. असो. पण… पण ते येनार आहेत. साहेब नक्कीच येनार आहेत.
तेव्हा हा परिसंवाद दुसऱ्या भागात सुरू राहील. सगळ्यांनी पुन्हा यायचं आहे. नक्कीच यायचय. सगळ्यांना बोलायला मिळेल. आजचा कार्यक्रम इथेच संपतोय. जय हिंद ! जय महाराष्ट्र! प्लीज सगळ्यांनी जेवून जायचं आहे. मला साहेब रागावतील हुहुहु!
(क्रमशः)