वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने जिंकली. अंतिम सामन्यात मुंबईने ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला ८ धावांनी पराभवाचा धक्का दिला.
मुंबईने दिल्लीला पराभूत करत दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच दिल्लीला मात्र सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. पण असे असले तरी मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे.
दरम्यान, विजेत्या संघाला ६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटी रुपये मिळाले आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की यंदा बक्षीसाची रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. परंतु,विजेत्याला ६ कोटी आणि उपविजेत्याला ३ कोटी ही बक्षीस रक्कम गेल्यावर्षीही देण्यात आली होती. त्यामुळे अनेक रिपोर्ट्सनुसार या बक्षीस रक्कमेत यंदा बदल झालेला नाही.
मुंबई इंडियन्सने साखळी फेरीत ८ पैकी ५ सामने जिंकले होते. तसेच ८ पैकी ५ सामने जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक मिळवून थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मुंबईने एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सला पराभूत करत अंतिम सामना गाठला होता.
अंतिम सामन्यात मुंबईला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १४९ धावाच करता आल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने ४४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. यात तिने ९ चौकार आणि २ षटकार मारले. तिला नतालिया सायव्हर-ब्रंटने चांगली साथ देताना ३० धावांची खेळी केली. पण या दोघींव्यतिरिक्त कोणालाही फार खास काही करता आले नाही.
दिल्लीकडून गोलंदाजी करताना मारिझान काप, जेस जोनासन आणि नल्लापुरेड्डी चरानी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तेच ऍनाबेल सदरलँड्सने १ विकेट घेतली.
त्यानंतर दिल्लीला १५० धावांच्या लक्ष्यचा पाठलाग करताना २० षटकात ९ बाद १४१ धावाच करता आल्या. दिल्लीकडून मारिझान कापने २६ चेंडूत ४० धावांची झुंज दिली. जेमिमाह रोड्रिग्सही ३० धावा करून बाद झाली. अखेरीस निकी प्रसादने नाबाद २५ धावा केल्या. मात्र यांच्याशिवाय कोणीही काही खास करू शकले नाहीत. कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे मुंबईने हा सामना जिंकला.
मुंबईकडून गोलंदाजी करताना नतालिया सायव्हर ब्रंटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. एमेलिया केरने २ विकेट्स घेतल्या. तसेच शबनीम इस्माईल, हेली मॅथ्युज आणि साईका ईशाक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.