ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार झाला तोच मुळी रावणवधासाठी! भगवान विष्णूंचा हा सातवा अवतार. अर्थात रावणवधाच्या अगोदरही ‘परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम’ या व्रताला अनुसरून त्यांनी वेळोवेळी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुर्जनांचा नाश केलाच होता; पण जणू रावणवध होण्यासाठीच आधीच्या अनेक घटनांची साखळी तयार झाल्याचं आपल्याला नेहमीच जाणवतं. मग रामचंद्रांच्या वाट्याला आलेला वनवास असेल, सीतेनंही सोबत येण्याचा निर्णय घेणं असेल, एवढ्या वैभवाचा त्याग करणाऱ्या सीतेला सुवर्णमृगाचा झालेला मोह आणि मग सीतेचं हरण हे काही ठळक टप्पे. पण रावणाला मुळात सीतेचं हरण करावं हे कशामुळे वाटलं? तर त्याला कारणीभूत होती ती त्याचीच बहीण शूर्पणखा! रामायणातील एक खलनायिका. तिची व्यक्तिरेखा पाहिली की माणूस आतून कसा असू शकतो, त्याचा हेतू कसा वेगळाच असतो हे कळतं. माणसाची पारख करताना आजही उपयोग होऊ शकेल, असं वाटलं म्हणून ठरवलं की आज हिच्याविषयी लिहूयात.
अरण्यकांडात पंचवटी येथे राम, सीता, लक्ष्मण वास्तव्य करीत असतात, तेव्हा एक दिवस अचानक ही राक्षसीण आली. रामाचे रूप पाहूनच ती मोहित झाली. पण ही कशी होती? या शूर्पणखेचे वर्णन करताना वाल्मिकींनी रामाचेही वर्णन केले आहे. त्यामुळे दोघांमध्ये कसा टोकाचा विरोध होता हे लगेच कळून येतं. जसं रामाला पाहून लोक आनंदित होत, तर हिला पाहताच घृणा वाटे. दोघांमधील गुण - दुर्गुणही पाहा. रामाचे बोलणे सरळ, तर हिचे कुटिल होते. राम सदाचारी, तर ही दुराचारी अशा स्वरूपाचे बरेच परस्परविरोधी वर्णन येते.
तर ही शूर्पणखा आली, रामाला पाहून मोहित झाली आणि त्याने आकर्षित व्हावे म्हणून तत्काळ मायावी सुंदर रूप धारण करून आधी त्याची चौकशी केली, स्वतःची माहितीही दिली आणि लगेच मुद्द्याला स्पर्श केला. म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे आणि एवढ्यावर ती थांबत नाही, तर सीतेची मनसोक्त निंदाही ती करू लागते. ही तुझ्या योग्य नसून मीच तुला अनुरूप आहे. तरी मी हिला आणि तुझ्या भावाला खाऊन टाकते आणि मग आपण दोघे सुखाने राहू. तिचे हे असले बोलणे ऐकून रामचंद्रांना हसूच येते. ते सौंदर्य खोटे आहे हेदेखील ते लगेच ओळखतात आणि आता ते जे काही बोलतात त्यावरून त्यांचं व्यवहारचातुर्य दिसतं.
त्या शूर्पणखेवर रागावणं, तिच्याशी वाद घालणं किंवा समजावणं यापैकी ते काहीच करीत नाहीत. कारण त्या व्यक्तीची तेवढी पात्रता तर हवी! योग्यता नसेल तर अशा व्यक्तीसमोर शक्तिपात का करावा? ती डोकेफोड व्यर्थच ठरते. हेच रामचंद्र इथे दाखवून देतात. तिची जरा गंमतच करतात आणि तिला म्हणतात. ‘‘अगं, माझी पत्नी इथे आहे, तरी पण माझा भाऊ लक्ष्मण तो तर एकटाच आहे, त्याला विचारून पाहा.’’ लक्ष्मणही तेवढाच चतुर. तोही तशीच थट्टा करीत म्हणतो. ‘‘तू माझी पत्नी झालीस, तर मी भावाचा सेवक आहे, तशी तुला सेवा करीत जगावे लागेल. त्यापेक्षा तू त्याचीच धाकटी पत्नी हो. तशीही सीतेपेक्षा तूच सुंदर आहेस.’’ यातील उपरोध शूर्पणखेला समजला नाहीच, उलट ती सीतेवर धावून गेली. त्यावेळी रामाने सावधपणे तिला रोखले व लक्ष्मणाला तिला अद्दल घडवण्याची आज्ञा केली. तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक व कान छाटून टाकले.
आता खरे पाहता तिचा वधही सहजशक्य होता; पण रावणवध अधिक महत्त्वाचा होता. त्यामुळेच तिचे केवळ नाक व कान छाटले गेले. ती स्त्री असण्याचा इथे संबंधच नाही, कारण रामचंद्रांनी अगोदर त्राटिकेचा वध केलेला आहे. अधर्माने वर्तन करणाऱ्याला शासन करावे ही रामायणाची शिकवण आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता।’ हे आपली संस्कृती शिकवतेच; पण सन्मान करीत आहेत म्हणून आम्ही कशाही वागणार, गैरफायदा घेणार ही सवलत मात्र नाही. श्रीकृष्णानेही पूतनेचा वध केलाय. आजकाल स्वार्थासाठी स्त्रिया खोटे आरोप करतात, अशा स्वरूपाच्या घटना कानावर येतात तेव्हा या प्रसंगांची प्रकर्षाने आठवण होते.
तर ही शूर्पणखा अजूनही गप्प बसत नाही, रामाशी युद्ध कर म्हणून खराला पाचारण करते. पण महापराक्रमी खरासह चौदा हजार राक्षसांचा राम-लक्ष्मण संहार करतात. त्यानंतर ही रावणाकडे जाते.
फक्त बहिणीचे नाक छाटले म्हणून काही रावण युद्ध करणार नाही, हे शूर्पणखा जाणून आहे. शिवाय तिला सीतेचा अडथळा दूर करायचा आहे. म्हणून ती रावणाने सीतेकडे आकृष्ट व्हावे, यासाठी ती चक्क सीतेची स्तुती करायला सुरुवात करते. वाचक म्हणून आपणही थक्क होतो, की सीतेची निंदा करणारी हीच का ती शूर्पणखा! मनातून एवढा द्वेष करते, तर त्याच सीतेची इतकी स्तुती? पण स्वार्थी माणसं अशीच असतात. स्वार्थ साधल्याशी मतलब, त्यासाठी काहीही करतील. ‘पोटात एक आणि ओठात एक’ हेच ते दुर्जनाचे लक्षण! आपण एखाद्याचे बोलणे मनावर घेतो, त्याचा फार विचार करत बसतो; पण त्याला एखादे काम साधायचे असते इतकेच. म्हणूनच ती पारख करता यायला हवी!
बरे, ही स्तुती तरी काय करते? वर्णन पुष्कळ आहे, पण थोडक्यात सांगते. ‘‘सीतेचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. जगात आणि स्वर्गातही कुणीही देवी वा अप्सरा तिच्याइतकी सुंदर नाही. तिचा पती राम हा अशी पत्नी मिळाल्याने भाग्यशाली खरा, पण खरंतर तूच तिच्यायोग्य आहेस.’’ झालं! ही मात्रा अहंकारी रावणाला चांगलीच लागू पडली आणि हा अहंकारच सीताहरणाला निमित्त ठरला आणि त्यामुळे रावणाने सर्वनाशच ओढावून घेतला.
दुर्जन कसे असतात, त्यांची पारख कशी करायची, त्यांच्याशी प्रसंगी कसे बोलावे आणि वेळ आली तर धडा शिकवावा (अर्थात आजच्या काळात कायदा हातात न घेता) याचा जणू वस्तुपाठच या प्रसंगातून मिळतो.
शूर्पणखा सीतेबद्दल अक्षरशः वाट्टेल ती भाषा वापरत असतानाही राम-लक्ष्मण यांचा मनाचा तोल ढळत नाही आणि तशी वेळ येताच ते धडा शिकवल्याशिवाय राहत नाहीत. असं एकेका प्रसंगातून वाल्मिकी रामायण आपल्याला खूप काही शिकवून जातं. या मूळ ग्रंथाची गोडी खरंच अवीट आहे. यातील मूल्यं, तत्त्वं शाश्वत असल्याचा प्रत्यय पानोपानी येतच राहतो. गदिमांच्याच गीतातील शब्दांनी आपला निरोप घेते.
‘जोवरी जग हे जोवरी भाषण
तोवरी नूतन नित रामायण’
(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)