दया नाईक - saptrang@esakal.com
‘आगरी’ म्हटलं की ‘मीठ आणि शेती पिकवणारा समाज’ असंच आपल्या डोळ्यासमोर येतं. या समाजाची बोलीभाषा - ‘आगरी’. पण बोलीभाषेविषयी लिहिण्यापूर्वी आधी या समाजासंबंधी थोडी माहिती द्यायला हवी. एक कथा अशी, की रावणाच्या दरबारात ढोल वाजवणारा हा समाज होता आणि त्यांच्या कलेवर प्रसन्न होऊन रावणाने त्यांना पश्चिम समुद्र किनारपट्टी बक्षीस म्हणून देऊ केली. म्हणजे हा समाज कलेतही निपुण होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच कदाचित आजही आगरी गीतं लोकांच्या मनावर राज्य करतात. नाशिक जिल्ह्यात हाच आगरी समाज ‘पाथरवट’ म्हणून व्यवसाय करतो. काही पुरातन मंदिरं बांधण्यात पाथरवट आगरी समाजाचे कारागीर होते, असा उल्लेख सापडतो. चिमाजी आप्पा यांनी वसई जिंकली, त्या वेळेस ‘दोनशे पाथरवट बोलावून किल्ल्याच्या चिरा भेदून त्यात सुरुंगाला जागा करण्यात आली आणि ते सुरूंग इशाऱ्याने एकाच वेळी उडवण्याची योजना ठरली,’ असा उल्लेख चिमाजी आप्पांच्या पत्रात सापडतो. ते पाथरवट म्हणजे हा आगरी समाज.
आगरी समाजाला कलेचा वारसा तर आहेच, त्याबरोबर सांस्कृतिक वारसाही आहे. प्रभू श्रीरामांच्या लग्नात ‘धवले’ गाण्याची प्रथा सुरू झाली आणि भगवान श्रीकृष्णांच्या लग्नातही ते गायले गेले असे सांगितले जाते. ‘महदंबा’ ही प्रथम धवला रचणारी स्त्री असा संदर्भ सापडतो. ती प्रथा आजतागायत आगरी समाजात रूढ आहे. धवले गाणारी स्त्री म्हणजे ‘धवलारीन’ लग्नकार्यात पूर्ण विधी आणि क्रिया करून घेते. काही धवले आणि आगरी पारंपरिक गीतांत सीता-स्वयंवराच्या कथेवरील रचना आहे.
‘मिथिला नगरी जनक पुरामधी गो
उपवर सीता झाली आता लग्नाची गो’
तसाच धवला द्रौपदी स्वयंवराचाही सापडतो -
‘गोमुट्याचे झाराखाली
सभा भरली पांडवांची
सभा भरली कौरवांची’
रावणाने सीतेचं हरण केलं. त्यावर एक पारंपरिक गीत असं -
‘तला भरला पाण्यानी सये कमलानी
धावा धावा हो मामंजी
सीता नेली रावणानी’
बऱ्याचशा धवला किंवा पारंपरिक गीतांत ओळींच्या शेवटी ‘गं’ किंवा ‘गो’ लावला जातो. ते ऐकायलाही
गोड वाटतं.
आगरी समाज कधी एकाच व्यवसायात अडकून राहिला नाही. मुंबईचा मूळ मालक असलेला हा भूमिपुत्र मीठ आणि शेती पिकवतच होता, त्याबरोबर कमीअधिक प्रमाणात मासेमारीही करत होता. शहरीकरण होत असताना बांधकामासाठी लागणाऱ्या विटा आणि रेती यांची गरज बघून वीटभट्टी आणि पारंपरिक पद्धतीनं रेती काढण्याच्या व्यवसायातदेखील तो पाय रोवून उभा राहिला. काळानुसार काही पारंपरिक व्यवसाय बुडाले, तरी जमेल ते आणि मिळेल ते व्यवसाय करत आगरी समाज मुंबई उपनगरात आपलं अस्तित्व राखून आहे.
आगरी समाज मनमिळाऊ, तिखट पण तितकाच गोडसुद्धा! अशी ओळख असणाऱ्या समाजाची भाषाही तशीच. ज्यांना ती समजत नाही, त्यांना कदाचित ती टोचेलसुद्धा! कारण वाक्याच्या सुरुवातीलाच अस्पष्ट शिवीसदृश अर्थ असणारा शब्द असतो. उदा. ‘चे बना’, ‘ज्यायला’... पण एकदा का ही भाषा समजायला लागली, की आपलीशी आणि हवीहवीशी वाटायला लागते. म्हणूनच उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेल्या इतर भाषकांनाही आगरी भाषा समजू लागते आणि ते बोलायलाही लागतात. अगदी कमी शब्दांत व्यक्त होता येते अशी ही बोलीभाषा आहे - उदा. काय - कं, पाय - पं, गाय - गं, तर - तं! अशाचप्रकारे आगरी भाषेत आईला ‘बं’ आणि सहा या अंकाला ‘सं’ म्हणतात.
मराठी प्राकृत आणि अंशतः संस्कृत समाविष्ट होऊन तयार झालेल्या या बोलीभाषेत मुस्लिम आक्रमणांच्या वेळेस काही उर्दू शब्दांचीही गुंफण झाली. उदा. ‘जरा तरी मोठेछोट्यांचा आदब ठेव’, ‘तुला शराम हं कं नाय?’, ‘जरा पन सुकून नाय’, ‘मी मजबूर हाव’ वगैरे. मराठीतील काही शब्द आगरीत बोलण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. त्यात फक्त ‘ताव’ हा शब्द शेवटी जोडावा लागतो. उदा. ‘मी करतो - मी करताव’, ‘मी धावतो - मी धावताव’, ‘मी नाचतो - मी नाचताव’, अशी मोठी यादी
तयार होईल.
आगरी भाषेत जड आणि जिभेवर जोर द्यायला लावणारी अक्षरं नाहीत. उदा. ‘गाढव - गारव’, ‘माकड - माकर’, ‘लढा - लरा’, ‘अडाणी - आराणी’, असा ‘ढ’ किंवा ‘ड’ ऐवजी ‘र’चा उच्चार केला जातो. मुंबईत उत्तर भारतीय मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनादेखील ही भाषा जवळची वाटते, कारण त्यांच्या भाषेची थोडीशी रचना आणि उच्चार बदलले की निम्म्याहून अधिक आगरी भाषा ते सहज बोलू शकतात. उदा. ‘मैं करता हूँ - मी करताव’, ‘मैं देता हूँ - मी देताव’, ‘मैं नाचता हूँ - मी नाचताव’. ‘मैं’च्या जागी ‘मी’ आणि ‘हूँ’च्या जागी ‘व’ ठेवून अनेक वाक्यरचना तयार होतात. ‘मला जायचंय/ मुझे जाना हैं - मला जावाचा हं’, ‘मला खायचंय/ मुझे खाना हैं - मला खावाचा हं’, ‘मला द्यायचंय/ मुझे देना हैं - मला देवाचा हं’. ‘मुझे’ऐवजी ‘मला’ असा उच्चार केला आणि ‘जाना/देना’मधून ‘ना’ वगळून ‘वाचा’ हा शब्द जोडावा लागतो. तर ‘हैं’ ऐवजी ‘हं’ शब्दप्रयोग करावा लागतो. अशा प्रकारे ज्यांना मराठीची विशेष माहिती नाहीये किंवा बोलण्याची सवय नाहीये, तेही आगरी बोलीभाषेत भरपूर वाक्यं तयार करू शकतात.
सर्व बोलीभाषा गोडच आहेत. पण आगरी भाषेची ठेवण, लचक आणि लहेजामुळे ती आकर्षकपणे उठून दिसते. ‘व्’ आणि ‘ह्’ यांचं मिश्रण करून ‘व्हं’ हा शब्द उच्चारला जातो, तेव्हा असं वाटतं, की हार्मोनियमवर एखाद्या सुराला फक्त हलकासा स्पर्श करून मुख्य सुरावर पकड घ्यावी आणि एक गोड ध्वनी ऐकू यावा! कदाचित हेच कारण असावं, की अनेक जण या रसाळ आणि मधाळ बोलीभाषेच्या प्रेमात पडतात. या बोलीविषयी आणखी सविस्तर बोलूच, पुढच्या भागात...