एक कल्पना करुयात! तुकोबांच्या काळात आजचा 'मीडिया' असता तर?
... तर त्यांच्या आयुष्यातला संघर्ष कसा राहिला असता?
"कदाचित, तुकोबांच्या आधी मीडियावालेच इंद्रायणी काठी जमा झाले असते.
धर्मपीठानं शिक्षा सुनावल्यानंतर हातात गाथा घेऊन इंद्रायणी काठी निघालेल्या तुकोबांच्या एका बाईटसाठी त्यांच्यामागे सगळे बुमधारी रिपोर्टर पाठलाग करते झाले असते.
तुकोबांच्या गाथा बुडवण्याच्या घटनेचं वार्तांकन अगदी 'लाईव्ह' स्वरुपात झालं असतं. चॅनेल्सवर 'डीबेट शो' झाले असते तर ट्विटरवर तुकोबांच्या समर्थनार्थ आणि विरोधातही 'हॅशटॅग वॉर' सुरु झालं असतं."
कल्पना संपली.
तुकोबांच्या काळात ना सोशल मीडिया होता, ना चॅनेल्स होते. इतकंच काय छपाई तंत्रज्ञानही नव्हतं. जे काही होतं ते हस्तलिखित ग्रंथ आणि कीर्तनासारख्या माध्यमातून होणारा मौखिक प्रचार....
अख्यायिकेनुसार, तुकोबांची गाथा बुडवण्यात आल्यानंतर तेरा दिवसांनी ती आपोआप तरली, असं सांगितलं जातं.
खरं तर, कसलंच काहीच माध्यम उपलब्ध नसताना पाण्यात बुडवण्यात आलेले तुकोबांचे अभंग आजतागायत कसे टिकून राहिले असतील आणि तुकाराम नावाचा एक खेडूत कवी आजही आपला प्रभाव कसा काय टिकवून आहे, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.
म्हणूनच, शेकडो अभंग असणारी ही गाथा तुकोबांना स्वहस्ते का बुडवायला सांगण्यात आली, हा प्रश्न जितका महत्त्वाचा ठरतो, तितकाच महत्त्वाचा आणखी एक प्रश्न आहे, आणि तो म्हणजे काळाच्या पटलावर तब्बल चारशे वर्ष ही गाथा तरंगत कशाप्रकारे आपला प्रवास करते आहे?
तिच्या अव्याहतपणे तंरगत राहण्याचा हा प्रवास थोडक्यात...
तुकोबांचं पहिलं चरित्र महपती ताहराबादकर यांनी लिहिलं. हे पहिलं चरित्र तुकोबांच्या निर्वाणानंतर तब्बल दीडशे वर्षांनंतर लिहण्यात आलं असल्यानं अर्थातच त्यामध्ये काळाच्या म्हणून मर्यादा असणं उघडच आहे आणि या मर्यादा अनेक संशोधक-अभ्यासकांनी उघड करुन दाखवल्या आहेत.
तुकोबांच्या या गाथेबद्दल लिहिताना लेखक दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या 'तुकोबांचे वैकुंठगमन' या पुस्तकात लिहितात की, "लोकपरंपरेनुसार आणि वारकऱ्यांच्या मौखिक संस्कृतीत तुकोबा एक वंद्य संतपुरुषच नव्हेत तर एक अवतारी महात्मा होते. फार काय पांडुरंगाचे कृपाछत्र त्यांच्यावर कायम असल्यामुळे संकटकाळी काही ना काही चमत्कार करून विठोबा आपल्या ह्या प्रिय भक्ताची सही सलामत सुटका करत असे अशा अर्थाच्या अनेक आख्यायिका उत्स्फूर्तपणे लोकांनी निर्माण केल्या."
पुढे ते लिहितात की, "दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त होऊन गेला ही ऐतिहासिक घटना अशीच चमत्काराच्या आणि रहस्याच्या वलयात कायम अतर्क्य रूप धारण करून मिथक होऊन स्थापित झालेली आहे. ख्रिस्त सुळावर चढवला गेला आणि ईश्वरी चमत्काराने तीन दिवसांनी त्याचे पुनरुत्थान झाले. तशीच गाथेच्या जलदिव्याची कहाणी आहे. अन्नपाणी वर्ज्य करून तुकोबांनी पांडुरंगाला निर्वाणीची आण घातली आणि त्यांच्या बुडालेल्या वह्या 'उदकीं कोरड्या' राहिलेल्या सहीसलामत बाहेर आल्या. आज देहूच्या देऊळवाड्यात तुकोबांच्या वारसांकडे आलेली जी एक अनेक पाने गहाळ झालेली वही आहे तिला 'भिजकी वही' म्हणूनच ओळखण्यात येते."
मात्र, नेमकं काय घडलं असावं, याबाबत ते आपलं असं एक वेगळं आकलन मांडताना दिसतात. जलदिव्याचा पर्यायी असा एक वेगळा अन्वय लावताना ते लिहितात की, "तुकोबांचा तेरा दिवसाचा 'सत्याग्रह' लोकांना संघटित करणारी क्रांतीकारक कृती होती. त्यांचे विरोधक घाबरले. ज्या वह्या आपण बुडवल्या असे त्यांनी जाहीर केले होते त्या तरंगून वर आल्या असे त्यांनाच जाहीर करावे लागले. त्या बुडवण्याची हिंमत त्यांना न झाल्याने त्या सुरक्षितच होत्या."
"तुकोबांच्या गाथेचे जलदिव्य हे 'सत्य' असो वा मिथकरुपी तथ्य असो, मराठी काव्याच्या आणि संस्कृतीच्या इतिहासातली ती एक क्रांतीकारक घटना आहे. वेदांचा अधिकार नसलेल्या शूद्रांचे विचारस्वातंत्र्य आणि अविष्कारस्वातंत्र्य पुकारणारी आणि स्थापित करणारी ती महत्त्वाची घटना आहे," असं ते आवर्जून सांगतात.
भिजकी वही ते गाथा छापण्याचा पहिला सरकारी प्रयत्नखरं तर तुकोबांच्या काळात छपाई तंत्रज्ञान नव्हतं. त्यामुळे, लोक अशा हस्तलिखित गाथा नकलूनच घ्यायचे.
तुकोबांच्या वह्या तरंगून सुरक्षित व कोरड्या वर आल्या असं समजल्यानंतर तेव्हाच्या भाविकांनी प्रसाद म्हणून त्यांच्या गाथेची पानं लुटून नेल्याचं तुकारामांचे चरित्रकार महिपती सांगतात.
याचा अर्थ असा आहे की, तुकोबांनी त्या काळात जरी आपली गाथा स्वहस्ताक्षरात लिहून ठेवलेली असली, तरी त्यांच्या हातची संपूर्ण संहिता जशीच्या तशी शिल्लक राहिलेली नसणार, हे उघड आहे. आज त्यांच्या गाथेचं अस्सल समजलं जाणारं एकुलतं एक हस्तलिखित देहू देवस्थानच्या संग्रहात आहे.
तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक असलेले संताजी तेली जगनाडे आणि संताजींचे चिरंजीव बाळोजी हे तुकोबांचे कीर्तनात उत्स्फुर्तपणे निघालेले अंभग टिपून घेण्याचं काम करायचे.
त्यातील संताजींच्या हातचे तेराशे अभंग पुढे वि. ल. भावे यांनी प्रकाशित केले. बाळोजींचे हस्तलिखित अप्रकाशितच आहे. पण ही संपूर्ण 'जगनाडे संहिता' पाहिली, तरी त्यात महाराजांच्या एकूण अभंगांपैकी निम्म्याहूनही अधिक अभंग दिसत नाहीत.
दरम्यानच्या काळात, वेगवेगळ्या फडांवर मौखिक परंपरेतून पुढे पुढे चालत आलेले तुकोबांचे अभंग जतन होत राहिले. त्यामुळे, वेगवेगळ्या फडांच्या वेगवेगळ्या गाथा सिद्ध होत गेल्या. अर्थातच, या विविध गाथांमधील काही अभंग एकसारखे होते, तर काही निरनिराळे होते.
काही तुकोबांचे आहेत की नाही, याबाबत शंका घ्यावेत असे प्रक्षिप्त होते, तर काही काळाच्या ओघात गहाळही झालेले असणार आणि आपल्यापर्यंत कधीच पोहोचलेलेही नसणार, हे उघड आहे.
मात्र, ते कीर्तनाच्या माध्यमातून मौखिक स्वरुपात तर हस्तलिखितांची नक्कल करवून घेतल्याने लिखित स्वरुपात संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत गेले.
हस्तलिखित नकलून घेण्याच्या प्रक्रियेबाबतचा इतिहास 'होय होय वारकरी' ग्रंथांचे लेखक हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी सांगितला.
ते सांगतात की, "हस्तलिखित गाथा नकलून घेण्यासाठी 1864 साली दोन हजार रुपये खर्च व्हायचा, अशी नोंद लोकहितवादींनी केली आहे. आजच्या भाषेत हा खर्च एक ते दीड कोटी रुपयांचा असावा. इतका खर्च कशामुळे येत असावा? तर, आठ-दहा खेड्यात शिकलेला एखादाच माणूस या कामासाठी लावायचा, त्यात वेगळ्या प्रकारची शाई, तसाच वेगळ्या प्रकारचा दीर्घकाळ टिकेल असा कागद वापरुन केलेली बांधणी. शिवाय, गाथा सिद्ध झाल्यावर हत्तीच्या अंबारीतून तिची मिरवणूक आणि त्यानंतर मग त्या गाथेचं स्वतंत्र मंदिर, अशा प्रक्रियेतून ही हस्तलिखित गाथा सिद्ध व्हायची. याच प्रक्रियेतून गेलेली गाथा प्रमाणभूत मानली जायची."
मात्र, तुकोबांची 'समग्र' अशी गाथा छपाई यंत्राच्या माध्यमातून छापण्याचा पहिला सरकारी प्रयत्न केला तो एका इंग्रज अधिकाऱ्याने!
पहिल्या छापील गाथेसाठी इंग्रज अधिकाऱ्याने केले प्रयत्नयासंदर्भात माहिती देताना तुकोबांचे वंशज आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आपल्या 'तुकाराम दर्शन' या ग्रंथात लिहितात की, "1860 साली सर अलेक्झांडर ग्रँट मुंबईत प्रोफेसर म्हणून रुजू झाले. ते उदारमनस्कर विद्वान असल्यामुळे त्यांचे लक्ष मराठी संतसाहित्याकडे जाणे स्वाभाविक होते. ग्रँट तुकोबांच्या अभंगामुळे खूपच प्रभावित झाले. याच काळात ख्रिस्ती मिशनऱ्याचा हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर चालला होता. त्या काळात त्यांनी युरोपीय मंडळींना तुकोबांचा परिचय व्हावा, म्हणून इंग्रजीत लिहिलेल्या एका निबंधांत त्यांनी म्हटलंय की, 'ज्यांच्या मुखी तुकारामांची वाणी आहे, त्यांना नैतिकदृष्ट्या ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे, हे पटवून देणं दुरापास्त आहे.' "
एत्तद्देशीय मराठी माणसाला तुकोबांची गाथा शुद्ध स्वरुपात आणि स्वस्तात उपलब्ध करुन द्यावी आणि हे काम इंग्रज सरकारने करावे, असं सर अलेक्झांडर ग्रँट यांना वाटलं आणि त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. तुकोबा हे राष्ट्रीय कवी असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक व्हायला हवे, या धारणेतून त्यांनी गाथेचं हे काम शंकर पांडुरंग पंडित यांच्याकडे सोपवलं. इंदुप्रकाश या छापखान्याने ही गाथा छापली. या गाथेचा पहिला भाग 1869 तर दुसरा भाग 1873 रोजी प्रकाशित झाला.
पंडितांनी या गाथेच्या संपादनासाठी देहू, तळेगाव, पंढरपूर व कडूस येथील प्रती वापरल्या. ही गाथा वारकऱ्यांनाही मान्य व्हावी यासाठी तत्कालीन प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह.भ.प. भाऊसाहेब काटकर यांचे शिफारसपत्र गाथेला जोडलेलं आहे.
त्या काळात या गाथेसाठी चोवीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता. आज जी आपण गाथेची शासकीय प्रत म्हणून संदर्भासाठी वापरतो, ती हीच! या गाथेत तुकोबांचे जवळपास साडेचार हजार अभंग समाविष्ट आहेत.
भिजल्या वहीचे अभंग...दिलीप पुरुषोत्तम चित्रे ज्या भिजल्या वहीचा उल्लेख आपल्या पुस्तकात करतात त्या भिजल्या वहीची काही बोटावर मोजण्याइतकी दुर्मिळ हस्तलिखितं आजही पंढरपूर वा देहूमधील काही पारंपरिक वारकऱ्यांकडे आहेत. त्यातलं एक हस्तलिखित पंढरपूरातील नामदेव महाराज लबडे यांच्याकडे आहे.
या भिजल्या वहीसंदर्भात माहिती देताना शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख नंदकुमार मोरे सांगतात की, "मूळ स्वरुपातल्या अभंगांच्या ज्या वह्या होत्या, त्या वह्यांमधील ही कदाचित आजच्या काळात उपलब्ध असलेली ही शेवटची वही असावी. तुकोबा जेव्हा कीर्तनाला उभे रहायचे, तेव्हा ते अभंग कोणत्या क्रमाने म्हणायचे, त्याचं स्वरुप काय होतं, याचा अंदाज येण्यासाठी हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, सगळ्या गदारोळात वाचलेली ही वही आहे, म्हणून तिला भिजल्या वहीचे अभंग म्हणतात. दादा महाराज सातारकरांचे शिष्य असलेल्या बाबाजी परांजपे यांना या भिजल्या वहीचं महत्त्व लक्षात आलं होतं. त्यांनी ही हस्तलिखित गाथा दादा महाराज सातारकरांच्या निरुपणासहित 'भिजल्या वहिचे अभंग' म्हणून पुस्तकरुपात संपादित करण्याचंही काम केलंय."
पुढे ते सांगतात की, "या गाथेत तुकोबांचे साडेसातशे अभंग आहेत. तुकोबांनी एकाच वेळी रचलेले एकापेक्षा अधिक अभंगांचे गट या गाथेत सुसंगतीनुसार सापडतात. या क्रमामुळे अभंगांच्या अर्थाचा सहज उलगडा होतो. थोडक्यात, अभंगांचा गट आणि क्रम हा तुकोबांच्या गाथेच्या अर्थनिर्णयासाठी महत्त्वाचा ठरतो. या वहीची नक्कल सखा हरी आबा वैकुंठे या वारकऱ्याने केली आहे. त्यामुळे, देहूत तरंगून आलेल्या वह्यांपैकी एक अशी मान्यता या भिजल्या वहीला आहे. हे बाड किमान दोनशे-अडीचशे वर्षे जुनं असेल."
भिजल्या वहीविषयी माहिती देताना ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगतात की, "जशा अभंगांच्या ओळी एकमेकांशी संलग्न असतात, तशाच प्रकारे अभंगांची चरणेही एकमेकांशी संलग्न असतात. याला ओळीची गाथा म्हणतात. भिजल्या वहीतील अभंग हे असेच आहेत. त्यामुळे किमान हे साडेसातशे अभंग तुकोबांचेच अस्सल अभंग आहेत, असं म्हणायला पुरेसा वाव आहे."
गाथेतील कोणता अभंग खरा नि कोणता खोटा?तुकोबांच्या अभंगांमधील काही अभंग अत्यंत बंडखोर, पुरोगामी आणि प्रस्थापित धर्मव्यवस्थेला हादरे देणारे आहेत तर काही सनातनी, जातीवाचक आणि परंपरागत मानसिकतेला कवटाळणारे आहेत.
त्यामुळे, तुकोबांच्या अभंगाच्या सत्यासत्यतेबाबतचे वाद नेहमी घडताना दिसतात. तुकोबांच्या गाथेतील मूळ अभंग नष्ट झाल्याचा तर बनावट अभंग घुसडल्याचा आरोपही होत असतो.
यासंदर्भात आम्ही डॉ. सदानंद मोरे यांच्याशी चर्चा केली.
'तुका म्हणे' या नावाने जेवढे अभंग आहेत, ते सगळे तुकाराम तात्या पडवळांनी एकत्र करुन एकूण आठ हजार अभंगांची गाथा तयार केली आहे. त्यात खरा-खोटा असा काहीच निवडा न करता त्यांनी साडेआठ हजार अभंग एकत्र केले आहेत, अशी माहिती मोरेंनी दिली.
ते म्हणाले की, "प्रक्षिप्त ही संकल्पना अभ्यासक आणि वारकरी अशा दोन स्तरावरची असते. वारकरी त्यांच्या श्रद्धेनुसार प्रक्षिप्ततेची कसोटी ठरवतात, तर अभ्यासक अर्थातच सर्व आधुनिक कसोट्यांनुसार त्याबाबतचा निवाडा करण्याचा प्रयत्न करतात. वारकऱ्यांच्या रुढ गाथेत जे नाहीयेत, असे प्रक्षिप्त ठरवण्यात आलेले काही अभंग तुकोबांचे नक्कीच आहेत. त्याबाबत खऱ्या-खोट्याची कसोटी आपण आपापल्या निकषानुसार, विवेकानुसार लावून ठरवावे लागेल."
यासंदर्भात ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी अधिक विस्ताराने माहिती दिली. 'तुकोबांची मूळ गाथा हीच', असं आपण सध्या कोणत्याच गाथेबाबत ठामपणे म्हणू शकत नाही, असं ते सांगतात.
पण त्यातल्या त्यात जी जास्तीत जास्त प्राचीन असेल ती मूळ गाथेच्या जवळ जाणारी प्रत आहे, असं आपण किमान म्हणू शकतो, असंही ते म्हणाले.
ते सांगतात की, "तुकोबांच्या सध्या उपलब्ध असलेल्या साडेचार हजार अभंगांपैकी काही अभंग प्रक्षिप्तही आहेत आणि काही बंडखोर अभंग वगळण्यात आलेले असण्याचीही शक्यता आहे. असे दोन्ही प्रकार मधल्या चारशे वर्षांच्या काळात झालेले आहेत. सध्या जी शासकीय गाथा म्हणतो, त्यातीलही काही अभंग ऐतिहासिकदृष्ट्या विसंगत आहेत आणि प्रक्षिप्त आहेत."
आपला मुद्दा पटवून देताना ते महाराष्ट्र शासनाच्या आवृत्तीतील 1886 ते 1890 या क्रमांकाने आलेल्या पाच अभंगांचं उदाहरण देतात.
या अभंगांमध्ये स्वत: तुकाराम महाराज आपल्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या शिवाजी महाराजांना रामदास स्वामींकडे मार्गदर्शनासाठी जा, असं सांगताना दिसतात. त्यामध्ये ते शिवरायांचा उल्लेख 'छत्रपती' असाही करताना दिसतात.
याविषयी बंडगर म्हणतात की, " 'छत्रपती' हे पद 1674 साली निर्माण झालं. ते 1650 च्या आधी लिहिल्या गेलेल्या अभंगांमध्ये कसं काय असू शकेल? लिहिणारा व्यक्ती इतिहासाबाबत पूर्ण अडाणी असल्याने अगदी अष्टप्रधानांचाही उल्लेख त्यात आला आहे. एक अभंग खोटा ठरला, याचा अर्थ असा की, सध्या उपलब्ध असणाऱ्या अभंगांमध्ये इतरही काही अभंग प्रक्षिप्त असू शकतात, अशी शक्यता त्यातून निर्माण होते. आणि असे काही अभंग प्रक्षिप्त असू शकतात, याचीही जाणीव वारकऱ्यांना नक्कीच होती."
याबाबत सदानंद मोरे म्हणतात की, "तुम्ही माझ्याकडे कशाला आलात, रामदासांकडे जा, असं सांगणारे ते अभंग प्रक्षिप्तच आहेत, यात काहीच वाद नाही. कारण, तुकोबांचं वैकुंठगमन होईपर्यंत रामदासांचं नावच महाराष्ट्रात नव्हतं. उलट, तुकोबा प्रसिद्धीच्या आणि सन्मानाच्या शिखरावर होते. अशा परिस्थितीत ते स्वतःची अशी निंदा करीत शिवबांना विन्मुख पाठवतील, हे शक्य नाही."
तुकोबांच्या गाथेत प्रक्षिप्त अभंग कुठून आले?तुकोबांच्या गाथेत प्रक्षिप्त अभंग येण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात, असं ज्ञानेश्वर बंडगर सांगतात.
"कुणाला तुकोबांचं महत्त्व कमी करुन दुसऱ्या व्यक्तीचं महत्त्व वाढवण्याचा हेतू असेल, तर कुणाला तुकोबांच्या विचारांची धार कमी करायची असेल."
आपला मुद्दा पटवून देताना ते
वेद आम्हावरी रुसोनिया गेला |
आम्ही त्याच्या बापाला धरिले कंठी ||
या अभंगाचा दाखला देतात.
ते सांगतात की, "हा अभंग प्रक्षिप्त ठरवण्यात आला आहे. अर्थातच, हा अभंग प्रस्थापित व्यवस्थेला झोंबणारा आहे. त्यामुळे, तो अभंगच नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. सध्या तो प्रक्षिप्त ठरवला गेला असला तरी पारंपारिक फडावर तो आजही म्हटला जातो."
मात्र, असं का घडलं असावं, याचं विश्लेषण करताना ते सांगतात की, "तुकोबांच्या गाथेला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व होतं. त्याला जनमानसात वेगळं स्थान होतं. त्याचं आचरण करणारे लाखो लोक आहेत, याचा फायदा घेण्याचा प्रयत्न निश्चितच झालेला असणार. त्यामध्ये, आपल्या सोयीचे अर्थ लावणे, सोयीचे अभंग रचून ते तुकोबांच्या नावाने प्रक्षिप्त करणं, आपल्याला अपेक्षित नसलेले बाजूला काढणं, वा अभंगांमधील शब्द बदलणं, हे सगळं घडणं स्वाभाविक आहे. प्रत्येकवेळी ते जाणीवपूर्वक झालेलं असेलच असंही नाही. काहीवेळा ते अनावधानानेही झालेलं असू शकतं. उदाहरणार्थ, तुकोबांच्या नंतर अनेकांचं नाव तुकाराम ठेवण्यात आलं. त्यातल्या एखाद्यानं रचलेला अभंग तुकोबांचाच आहे, असं समजून तोदेखील घेतला गेलेला असू शकतो," अशी शक्यताही बंडगर व्यक्त करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)