पुणे : सूर्य तळपल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेला असतानाच, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. चंद्रपूर येथे राज्याच्या उच्चांकी ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या (ता. १६) विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याचा, राज्यात उन्हाची ताप वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
चंद्रपूर पाठोपाठ ब्रह्मपुरी, सोलापूर आणि वर्धा येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती, नागपूर, मालेगाव आणि यवतमाळ येथे तापमान चाळीसपार होते. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपार गेल्याने तसेच तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंश व त्यापेक्षा अधिक वाढ झाल्याने अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर आणि यवतमाळ येथे उष्णतेची लाट आली होती.
दरम्यान धुळे, जेऊर, सांगली, सातारा, परभणी, भंडारा, गडचिरोली आणि वाशीम येथे कमाल तापमान ३९ अंशांपार होते. राज्यात उन्हाच्या चटका असह्य होऊ लागला असून, उकाड्यात वाढ झाल्याने चांगलाच घामाच्या धारा वाहत आहेत. आज (ता. १६) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : चंद्रपूर ४१.४, ब्रह्मपुरी ४१.२, सोलापूर ४१.१, वर्धा ४१, अकोला ४०.९, अमरावती ४०.६, नागपूर ४०.४, मालेगाव ४०.२, यवतमाळ ४०.