मायबोलीपलीकडची अक्षरे
मीनाचे आईबाबा दुपारी घरी आले तेव्हा समोरचं दृश्य बघून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खोलीत अस्ताव्यस्त पसारा, टेबल मोडलेलं, खुर्ची तुटलेली, बश्यांच्या काचा पसरलेल्या आणि खिडक्यांचे पडदेही फाटलेले! बापरे! घराची ही अशी अवस्था कशी झाली? ते सांगतेच, पण त्या आधी तुमची मीनाक्षीची ओळख करून देते.
मीनाक्षी म्हणजेच मीना ही नावाप्रमाणेच, माशासारखे डोळे असणारी एक छोटी मुलगी होती, अर्थात तिला तिच्या नावाचा अर्थ माहीत नव्हता. कारण तिने कधी शब्दकोशात तो शोधलाच नव्हता. शब्दकोशच काय मुळात तिने कधीच कोणत्याही पुस्तकाला हातसुद्धा लावलेला नव्हता.
तिला पुस्तके अजिबात आवडत नसत. तिलासुद्धा आणि तिच्या बोक्याला-मन्यालासुद्धा! मन्याचं कारण असं की, त्याच्या लहानपणी त्याच्या शेपटीवर एक पुस्तक पडलं होतं आणि त्यामुळे त्याचं बिचाऱ्याचं शेपूट नेहमीसाठी वाकडं होऊन बसलं होतं.
मीनाचे आई-बाबा मात्र खूप वाचत! त्यांच्या घरात सगळीकडे पुस्तकंच पुस्तकं होती. आता तुम्हाला वाटलं असेल की, एक मोठं कपाट भरून पुस्तकं असतील किंवा एखाद्या टेबलावर ती रचून ठेवलेली असतील, पण तसं नव्हतं!
सगळीकडे म्हणजे अगदी कपड्यांची कपाटं, सोफा, गाद्या एवढंच नाही, तर स्वयंपाकाच्या ओट्यावर आणि ओट्याखाली, जेवणाच्या टेबलावर, गॅलरीमधे, जिन्यात, बाथरूममध्येसुद्धा पुस्तकं होती! असं असूनसुद्धा आई-बाबा मात्र पुस्तक आणायचं थांबवत नव्हते.
मीना या सगळ्या पुस्तकांना वैतागलेली होती. स्वत: पुस्तक उघडून वाचणं दूरच, पण आई-बाबांनी पुस्तक वाचून दाखवायला सुरुवात केली तरी ती कानावर हात ठेवून ओरडत असे, “मला पुस्तकं आवडत नाहीत. मी वाचणार नाही आणि ऐकणारही नाही.' आता बोला!
एक दिवस सकाळी मीना उठून बाथरूममध्ये गेली. दात घासण्यासाठी तिला बेसिनमध्ये असलेली पुस्तकं आधी बाजूला करावी लागली. मग दूध घेण्यासाठी फ्रीज उघडल्यावर आधी तिला फ्रीजमधला पुस्तकांचा गठ्ठा काढावा लागला.
ओट्यावरची पुस्तकं खाली ठेवून त्यावर उभं राहून दूध गरम करताना मीनाच्या लक्षात आलं की, रोज या वेळी तिच्या भोवती घुटमळणारा मन्या आज दिसतच नाहीय! तिने त्याला हाका मारल्या पण मन्याने ‘ओ’ दिलीच नाही. ती गॅलरीमध्ये गेली, बाथरूममध्ये गेली, जिन्यात, कपाटाखाली पण मन्या कुठेच दिसेना! सगळीकडे दिसत होती फक्त पुस्तकं!
'म्याऽऽव” इतक्यात आवाज आला. आवाजाच्या दिशेने मीना धावत गेल्यावर तिला दिसलं की, जेवणाच्या खोलीतल्या पुस्तकांच्या एका उंच, मोठ्या ढिगाऱ्यावर मन्या अडकला होता. ही पुस्तकं खास मीनासाठी म्हणून आणलेली होती ज्यांच्याकडे तिने कधी ढुंकूनसुद्धा पाहिलेलं नव्हतं.
तळाला चित्रांशी पुस्तकं, मग त्यावर गाण्यांची, त्यावर छोट्या गोष्टींची, सगळ्यात वर परीकथा- साहसकथांची आणि या सगळ्यांवर चढून बसलेला मन्या! मन्याला खाली उतरण्यासाठी मदत करायला म्हणून मीनाने पुस्तकांवर चढायला सुरुवात केली. परीकथांपर्यंत ती पोहोचलीच होती तेवढ्यात धडाऽऽऽम! तिचा तोल जाऊन ती पुस्तकांसह खाली पडली.
पडल्यावर ती पुस्तकं उघडली गेली आणि काय आश्चर्य! उघडलेल्या पुस्तकांच्या पानांतून अनेक माणसं आणि प्राणी बाहेर पडू लागले. राजे, राण्या, राजकुमार, राजकन्या, सात बुटके, दुष्ट राक्षस, पऱ्या, लबाड कोल्हा, लांडगा, हत्ती, ससे अशा सगळ्यांनी ती खोली भरून गेली होती. ही सगळी मंडळी जागा मिळेल तिथे बागडत होती.
मीनाला काय करावं काही कळेना! तिला आतापर्यंत वाटत आलं होतं की, पुस्तकात फक्त शब्द, वाक्य असतात. फक्त अभ्यास असतो आणि एकदम बोरिंग असतात पुस्तकं. पण आता बघते तर काय? ससे आणि हरणं, पऱ्या आणि राक्षस पुस्तकातून अवतरले होते! त्या जेवणाच्या खोलीत आता नुसता आवाज, दंगा, आरडा ओरडा असा गदारोळ माजला होता. वैतागून मीना ओरडली, “सगळ्यांनी एकदम गप्प बसा!”
एका पायावर उभं राहून सोंडेने काचेच्या बश्या फिरवणारा हत्ती, पडदे फाडून अंगावर मिरवणारी माकडं, जांभळट रंगाचा जिराफ, टोपी घातलेलं एक बदक आणि या सगळ्यांच्या मधोमध गोंधळून गेलेली मीना असं मीनाच्या जेवणाच्या खोलीतलं दृश्य आणि पुस्तकातली सगळी बोलकी चित्र लॅनी फ्रँसन यांनी काढली आहेत.
मंजुषा पावगी यांनी पुस्तकं न आवडण्याऱ्या मीनाची ही गोष्ट लिहिलीय. या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, मीनाच्या गोष्टीला समांतर अशी चित्रांतून सांगितलेली मन्याची गोष्टही यात आहे. ती जाणून घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं. याचं मराठी रूपांतर मिलिंद परांजपे यांनी केलं असून ज्योत्स्ना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
मीनाचं “गप्प बसा” म्हणून ओरडणं त्या गोंधळात कोणापर्यंतसुद्धा पोहोचलं नाही. तिने मग एका सश्याला उचलून एका पुस्तकात कोंबण्याचा प्रयत्न केला पण ते पुस्तक होतं ‘मुलांसाठी पाककला’. त्यामुळे ससा धडपडत त्या पुस्तकातून बाहेर आला. ते त्याचं पुस्तक थोडीच होतं? एकाएकी अशा अनोळखी पुस्तकात जबरदस्ती ढकलला गेल्याने तो घाबरलाही होता.
आता काय करावं बरं? थोडा विचार केल्यावर मीनाने, सगळ्यांना ते कोणत्या कोणत्या पुस्तकातून आलेत ते विचारायचं ठरवलं, पण झालं असं की, ते ज्या पुस्तकांची नावं सांगत होते, ती पुस्तकं मीनाला माहितच नव्हती. त्या गोष्टीही तिला माहीत नव्हत्या. शिवाय एका कोल्ह्याला तर तो ‘कोल्होबाच्या गोष्टी’तून आलाय की ‘निळा कोल्हा’तून आलाय तेच आठवत नव्हतं.
सरतेशेवटी तिने एक पुस्तक उघडलं आणि सरळ वाचायला सुरुवात केली. ती वाचू लागली तसं हळूहळू सगळे प्राणी तिच्याभोवती जमा होऊ लागले. गडबड कमी होऊन खोलीत शांतता पसरली. सगळे जण गोष्टीत काय घडतय ते मन लावून ऐकू लागले. वाचताना मीना दुसऱ्या पानावर पोचली तेव्हा एका डुकराच्या पिल्लाने उडी मारली आणि ते पुस्तकात शिरलं.
त्याला त्याची गोष्ट मिळाली होती! मग मीनाने ते पुस्तक बंद केलं आणि ती पुढच्या पुस्तकाकडे वळली. असं करता करता खोलीतल्या एकेकाला आपापलं पुस्तक सापडत गेलं. मीनाचा निरोप घेऊन एक एक जण आपापल्या पुस्तकांच्या दुनियेत परत जाऊ लागलं.
आता खोलीत राहिला फक्त एक निळा कोट घातलेला ससा आणि मीनाकडे राहीलं शेवटचं पुस्तक - ‘नदीकाठी ससुला’. खरं तर हा ससुला जावा असं मीनाला अजिबात वाटत नव्हतं, पण परत जाण्यासाठी अधीर झालेला सश्याचा चेहरा तिने पहिला आणि गोष्ट वाचायला सुरुवात केली. लगेचच सश्याने टुणकन पुस्तकात उडी मारली.
खरंच किती वेगवेगळी विश्व सामावलेली असतात पुस्तकात! पुस्तक उघडलं की, जणू काही त्यातली पात्र आपल्या आजूबाजूला वावरतायत, त्यातल्या घटना आपल्या आजूबाजूला घडतायत असं वाटत राहतं. किती सुंदर असतो हा अनुभव. मीनाला सुद्धा हा अनुभव आला आणि तिच्या नकळत ती त्यात गुंगून गेली.
मीनाच्या फोनमधून, यूट्यूब वरच्या व्हिडियोज मधून, टीवी मधून हे सगळे प्राणी तिच्या खोलीत येऊ शकले असते का हो कधी, नाही न? त्यात सगळे खरे, जीवंत, चालते बोलते लोक असतात खरं पण पुस्तकातले प्राणी तर मीनाला हव्या त्या रूपात तिला भेटू शकत होते, पुस्तकातल्या वर्णनावरून ती गोष्टी कशा दिसत असतील याचे अंदाज बंधू शकत होती.
पुस्तकातल्या सगळ्या घटनांची दृश्य तिच्या नजरेसमोर तिला हव्या त्या गतीने येऊ शकत होती आणि किती तरी भन्नाट कल्पना तिला त्यावरून सुचू शकत होत्या! हा अनुभव काही एक मोबाईल मीनाला देऊ शकणारच नाही कधी.
ससा निघून गेल्यावर मीनाला घर कसं रिकामं रिकामं वाटू लागलं होतंं, पण तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की, ही सगळी पुस्तकं तिचीच आहेत. तिच्याजवळच असणार आहेत कायमची. त्यामुळे ती या सगळ्यांना तिला हवं तेव्हा भेटू शकणार होती! या विचाराने तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं! इकडे मीनाला पुस्तकांच्या गराड्यात बसून मन लावून पुस्तक वाचताना बघून आई-बाबांच्या चेहऱ्यावरसुद्धा समाधान झळकलं!