Maharashtra Legislative Council : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरूच; विधानपरिषदेसाठी उद्या नावे ठरणार, विरोधक शांत
esakal March 16, 2025 12:45 PM

मुंबई : विधानपरिषदेवरील पाच सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारपर्यंत (ता. १७) मार्च असल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना १४ ते १६ महिन्यांसाठी, शिवसेनेच्या एका नेत्याला सुमारे चार वर्षांसाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला तब्बल साडेपाच वर्षांसाठी आमदारकी मिळणार आहे. विधानसभेतील आमदार हे पाच सदस्य निवडून देणार आहेत. २८८ सदस्यांच्या सभागृहात महायुतीचे तब्बल २३० आमदार असल्याने विरोधक निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत नाहीत.

ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असली तरी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु ठेवली आहे. होळीच्या निमित्ताने मोठी सुट्टी मिळाल्याने राजकीय व्यूहरचनेसाठी त्यांनी दिल्ली, मुंबईतील नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू ठेवले आहे. भारतीय जनता पक्षाने तीन जागांसाठी तब्बल दहा नावांची शिफारस केंद्राकडे पाठवली आहे शिवसेना एका जागेसाठी पाच जणांच्या उमेदवारीवर गंभीर विचार करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला सर्वाधिक साडेपाच वर्षांचा कालावधी मिळणार असल्याने या जागेसाठी इच्छुकांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत.

भाजपच्या कोट्यातून परिषदेवर निवडून गेलेल्या प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर या सदस्यांची मुदत पुढच्या १४ महिन्यांसाठीच आहे तरीही आमदारकीसाठी तेवढी तर तेवढी संधी असे म्हणत इच्छुकांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुदत येत्या काही दिवसात संपेल आणि नवा अध्यक्ष निवडला जाईल. त्यांच्या नजीकच्या वर्तुळात असलेल्या बाळासाहेब चौधरी यांनी सदस्यत्वाची माळ आपल्याला मिळावी यासाठी श्रेष्ठींची मनधरणी केली असल्याचे समजते. आर्वी भागात पक्षाचे कार्य करणारे सुधीर दिवे, दादाराव केचे यांनी देखील या पदावर हक्क सांगितलेला आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माधवी नाईक, अल्पसंख्याक वर्गातील राम सातपुते, पश्चिम महाराष्ट्रातील सुरेश हातवळणे यांचे नावही पुढे आहेत. माधव भांडारी यांचे देखील नाव या चर्चेत आले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमरनाथ राजूरकर हेही शर्यतीत आहेत.

शिवसेनेत नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते चंद्रकांत रघुवंशी,डॉ.दीपक सावंत, पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, पक्षाची मोर्चेबांधणी करणारे संजय मोरे हे स्पर्धेत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्या जागेसाठी पक्षात कमालीची सुरस आहे. संग्राम कोते पाटील, आनंद परांजपे आणि झिशान सिद्दिकी यांची नावे आघाडीवर आहे. मात्र महिलेचे नाव पुढे येऊ शकते. माळी समाजातील एखाद्याला आमदारकी देता येईल काय, याबद्दल देखील पक्षात चाचणी सुरू असल्याचे समजते.

मविआची बैठक

सध्या विधानसभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता महायुतीला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष कोणताही उमेदवार मैदानात उतरवण्याचा मनःस्थितीत नाही मात्र महाविकास आघाडी यासंदर्भात उद्या एक बैठक घेणार आहे. पाचच अर्ज आल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. रविवारी (ता.१६) सुट्टीचा दिवस असला तरी नावे अंतिम टप्प्यात येतील, असे मानले जाते. सोमवार (ता.१७) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.