शशी वडेवालाची गेमचेंजर चटणी
esakal March 16, 2025 12:45 PM

प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com

पनवेलमधील तक्का पेट्रोलपंपावरचा शशी वडेवाला. इथे वडापावला चटणी लावून देण्याऐवजी छोट्या प्लेटमध्ये वेगळी दिली जाते. एका वडापावसोबत एवढी चटणी का दिली जातेय, हा प्रश्न सुरुवातीला पडतो पण पहिला घास त्यात बुडवून खाल्ल्यानंतर त्याचे प्रयोजन कळते. दिसायला हिरवी पण आंबट, गोड, तिखट अशा तिन्ही चवींचं मिश्रण असलेली ही चटणी खरी गेमचेंजर आहे.

प्रवासाच्या अंतिम मुक्कामाच्या ठिकाणापेक्षा प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे, असं म्हणतात. त्याच नियमाप्रमाणे ठिकठिकाणचे खाऊ अड्डे प्रवास संस्मरणीय करतात. काही प्रवास तर कुठे आणि काय खाल्लं यामुळेच लक्षात राहतात. हल्ली पावलोपावली असे खाऊ अड्डे तयार झाले आहेत. समाजमाध्यमे, वाहतुकीच्या सोयीसुविधा आणि प्रवाशांची एकूणच संख्या वाढल्यामुळे अशा ठिकाणी गर्दी होतेसुद्धा, मात्र चव टिकवून ठेवणे आणि लोकांना परत परत येण्यास भाग पाडण्यात सर्वजण यशस्वी होतातच असं नाही. नवउद्योजकांना हा प्रश्न भेडसावत असला तरी काही जुने खाऊ अड्डे आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेलमधील तक्का पेट्रोलपंपावरचा शशी वडेवाला.

नावातून बोध होत असल्याप्रमाणे बटाटा वड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी आणखी एका कारणासाठी लोकं लांबून येण्याचं कारण म्हणजे वड्यासोबत मिळणारी चटणी. प्लेटमध्ये एक वडा कमी दिला तरी चालेल पण चटणी द्या, असा बटाटा वडाप्रेमींचा आग्रह असतो. एका ठिकाणी स्थिरस्थावर होऊन पन्नास वर्षे आणि फिरतीचा कालावधी विचारात घेतला तर साठहून अधिक वर्षे शशीचा बटाटा वडा आपली चवीची गरमागरम, चमचमीच, कुरकुरीत परंपरा टिकवून आहे.

वसंत गोपाळ जगे हे मूळचे पनवेलकर. येथील प्रसिद्ध धूतपापेश्वर कारखान्यात ते हमालीचं काम करायचे. त्याचबरोबरीने अधिकचे पैसे मिळवण्यासाठी सर्कस लागली की उकडलेल्या शेंगादेखील विकायचे. एकूणच कष्ट करण्याची तयारी असल्याने त्यांना कधीही कुठल्याही कामाची लाज वाटली नाही. वसंत यांचे भिवंडी-वाडा येथील चिंचघरच्या तारामतींशी लग्न झाल्यानंतर अर्थातच खर्चाचा भार वाढला. तारामती यांच्या माहेरी त्यांचे खाद्यपदार्थांचे छोटेखानी हॉटेल होते. सासरी आल्यावर नवरा करीत असलेली मेहनत आणि कुठलंही काम करण्याची असलेली तयारी पाहून त्यांनी नवऱ्यासमोर हातगाडीवर खाद्यपदार्थ विकण्याचा प्रस्ताव ठेवला. आपले काम सांभाळून उरलेल्या वेळेत हा व्यवसाय करण्याची कल्पना त्यांना आवडली. ही गोष्ट साधारण १९६४-६५ सालची. वसंत आणि तारामती यांनी एक हातगाडी विकत घेतली घेऊन त्यावर बटाटे वडे आणि भजी विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्या गाडीचं ॲग्रिमेंट आजही त्यांच्या नातवाने जपून ठेवलंय.

तो काळ एका ठिकाणी बस्तान मांडून धंदा करण्याचा नव्हता. कारण बाहेरचे पदार्थ खाणे हीच चैनीची गोष्ट मानली जात असे. त्यामुळे वसंत आणि तारामती ठिकठिकाणी भरणाऱ्या जत्रा, बैलगाडा शर्यत, पनवेलमधील जुन्या गंगाराम आणि रतन टॉकीजच्या बाहेर चित्रपटांच्या दोन खेळांदरम्यान वडापावची गाडी लावायचे. काळ पुढे सरकत होता तशी आजूबाजूची परिस्थिती, आर्थिक गणितंदेखील बदलत होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडी ढकलून नेणं व्यावहारिकदृष्ट्या फारसं फायद्याचं नव्हतं.

त्यामुळे वसंत यांनी पनवेलच्या तक्क्यावर गाडी लावण्याचा निर्णय घेतला. वाहता रस्ता, शेजारी पेट्रोल पंप आणि ठरलेली जागा यामुळे हळूहळू लोकांना त्याची सवय लागली. जगे यांनाही धंदा करणं सोयीचं होऊ लागलं. त्यांची दोन मुलं शशिकांत आणि नरेंद्र वयाच्या ११-१२व्या वर्षीच आईवडिलांना मदत करू लागले. वाढत्या वयासोबतच दोघांनाही धंद्याची समज येत होती. दोघांनी धंदा चांगला वाढवला मात्र दोघांपैकी नरेंद्र अल्पायुषी ठरले. त्यामुळे शशिकांत यांच्या खांद्यावर सर्व भार आला. तो त्यांनी समर्थपणे पेलला. केवळ चव आणि आणि दर्जा यांच्या बळावर चालणाऱ्या या धंद्याला जवळपास २०१७ पर्यंत नावच नव्हते. जगे दाम्पत्याची पुण्याई आणि शशिकांत यांची मेहनत या बळावर जगेचा किंवा शशीचा वडापाव अशीच धंद्याची ओळख होती. पुढे शशिकांत यांचा मुलगा रोहनच्या रूपाने जगेंची तिसरी पिढी या धंद्यात आली असली तरी आजही शशीचा वडापाव खाण्यासाठी जुनी-नवी माणसे दुरून येत असतात.

शशीचा वडा अर्ध्या शतकाहून जुना असला तरी ‘शशी वडेवाले’ हे नामकरण आणि आता ज्या जागी दुकान आहे या सर्व गोष्टी अगदी अलीकडच्या आहेत. वडा गाडीवर विकला जात होता तोपर्यंत नावाचा प्रश्न आला नाही; परंतु हातगाडीवरून बस्तान दुकानात हलल्यानंतर नाव देणं गरजेचं होतं. हातगाडी आणि ग्राहकांशी शशिकांत यांच्या असलेल्या सर्वाधिक काळाच्या नात्यातून त्यांचेच नाव दुकानला देण्यात आले. बटाटा वडा, मूगडाळ भजी, कांदा भजी, कोथिंबीर भजी, पंजाबी समोसा, स्पे. मूग समोसा, कोल्हापुरी मिसळ आणि स्पे. पोहा मिसळ असा सहज तोंडपाठ होईल इतकात इथला मेन्यू आहे. पदार्थांच्या किमतीही माफक, पण चवीला तोड नाही. हातगाडीवरून दुकानात गेल्यावर मेन्यूमध्ये नवीन पदार्थ समाविष्ट करण्याचे प्रयत्न झाले, परंतु लोकांना ते प्रयोग फारसे रुचले नाहीत. त्यामुळे पूर्वीपासून चालत आलेल्या खाद्यपदार्थांवरच लक्ष्य केंद्रित करायचं ठरलं.

शशीच्या वड्यामध्ये जगावेगळे काही नाही, तरीही तो चवीला इतरांपेक्षा वेगळा आहे. इतर ठिकाणी बटाटा वड्यामध्ये घातली जाणारी हिरवी मिरची, आलं-लसूण, राई, गरम मसाला याच मूलभूत गोष्टी आम्हीदेखील वड्यात टाकतो; फक्त त्याच्या प्रमाणात फरक असल्याने चवीत फरक पडतो, असं रोहन सांगतात. बटाट्याची निवड मात्र ठरवून केली जाते. इथे वड्यासाठी जुना आगरा बटाटा वापरला जातो. हा बटाटा चिकट नसतो आणि वाफवून तळल्यानंतरही कडक होत नाही. बटाटा चावतानाही मजा येते. इथे वडापावला चटणी लावून देण्याऐवजी छोट्या प्लेटमध्ये ती वेगळी दिली जाते.

एका वडापावसोबत एवढी चटणी का दिली जातेय, हा प्रश्न सुरुवातीला पडतो पण पहिल्या घास त्यात बुडवून खाल्ल्यानंतर त्याचे प्रयोजन कळते. दिसायला हिरवी पण आंबट, गोड, तिखट अशा तिन्ही चवींचं मिश्रण असलेली ही चटणी खरी गेमचेंजर आहे. चिंच, खजूर आणि हिरवी मिरची या तीन वस्तूंचा यामध्ये समावेश असतो. मूगडाळ आणि चणाडाळीपासून तयार केली जाणारी गोल भजीसुद्धा इथली खासियत आहे. वडापावसाठी वापरला जाणारा पाव मुद्दाम छोट्या आकाराचा वापरला जातो. कारण पावामुळे वड्याची मजा मारली जाता कामा नये, हा त्यामागचा उद्देश. पावसुद्धा गेली अनेक वर्षे पनवेलच्या मोती बेकरीतूनच येत आहेत.

खरंतर एखाद्या पदार्थावर इतकी वर्षे तग धरून ठेवणे, हे खरंतर मोठे आव्हान असते. परंतु तुमचे प्रोडक्ट अस्सल असेल आणि सातत्य टिकवता आले तर हे सहज शक्य आहे, हे शशी वडेवाले यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

(लेखक मुक्त पत्रकार असून, लाइफस्टाईलचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.