दिलीप ठाकूर - glam.thakurdilip@gmail.com
‘गाना आये या ना आये गाना चाहिए’ ही झाली तुम्हा-आम्हा जनसामान्यांच्या जगण्यातील एक हौस. गुणगुणायला कधी गाण्याचा मुखडा गायला नि कधी संधी मिळताच जमेल तसे नाचायला न आवडणारा माणूस सापडणे अवघड. चित्रपटासाठी गायचे म्हणजे शास्त्र आले. शिक्षण हवे. साधना हवी. रियाज हवा. अलीकडे अनेक कलाकारांच्या आवाजाशी पार्श्वगायकाचा ‘सूर’ जुळत नसला तरी राज कपूर पडद्यावर गाणार ते मुकेश यांच्या आवाजात. किशोरकुमार व राजेश खन्ना यांच्या मैत्रीचे किस्से अनेक आणि त्यातूनच त्या दोघांचे आवाजही एकरूप झाले, असे त्यांचे कोणतेही गाणे गुणगुणले तरी जाणवते.
कलाकार व पार्श्वगायक अशा दोन व्यक्ती आणि एक सूर ही गोष्टच न संपणारी. दिलीपकुमार चक्क लता मंगेशकर यांच्यासोबत गायले. चित्रपट ‘मुसाफिर’. गाण्याचे बोल ‘लागी नहीं छुटे राम, चाहे जिया जाए’. शैलेंद्रचे गीत, सलील चौधरींचे संगीत. प्रेम चोप्रासुद्धा गायले, हे अनेकांना माहीत नसेल कदाचित. ‘नफरत’ या चित्रपटात ‘लो मेरा प्यार लो’ गाण्यात प्रेम चोप्रा गायले. फरियाल गात गात आपल्या सौंदर्याने त्यांना आव्हान देते, तेव्हा ते गद्यात गातात.
रेखादेखील गायल्या. अमिताभ बच्चन गाऊ लागले म्हणून रेखा यांना सूर गवसला असे बोलणारे, ऐकणारे, सांगणारे म्हणतात. अमिताभ यांचे ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो’ (मिस्टर नटवरलाल) हे बालगीत रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालामध्ये वरच्या क्रमांकावर आले, त्याच्या ध्वनिफीतीची विक्रमी विक्री झाली आणि त्यानंतर ते अनेकदा गायले. रेखा यांनीही बच्चेकंपनीसाठीच गाणे गायले. चित्रपट होता ‘अगर तुम न होते’. गाण्याचे बोल होते ‘कल तो संडे की छुट्टी है.’ सोबत शैलेंद्र सिंग होते. संगीतकार राहुल देव बर्मन यांनीच रेखा यांच्याकडून गाऊन घेतले.
‘चांदनी’तील ‘रंग भरे मौसम में’ गाण्यात श्रीदेवी हसत हसत छान गायल्या म्हणून माधुरी दीक्षितही ‘प्रेम पुजारन’ या चित्रपटासाठी गायली. तिचा तेव्हाचा स्टार सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथची केवढी धावपळ उडाली होती, विचारूच नका. त्याचे फोटो प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होत असतानाच तो चित्रपटच बंद पडला आणि त्या गाण्याचे काय झाले, तेही समजले नाही. अशी चित्रपट न बनल्यानेच अनेक गाणी ध्वनिमुद्रणापुरतीच राहिलीत.
कलाकाराचे गायन ही एक हौस आहे की कला आहे, असा वाद निर्माण होऊ शकतो; पण नसीरुद्दीन शाह यांनीही गावे? होय तसे घडले. आशा भोसले यांच्यासोबत ते गायले. तेदेखील संगीतकार राहुल देव बर्मन यांच्याकडे.
नसीरुद्दीन शाह यांनी कलात्मक चित्रपटातून भूमिका साकारणे कायम ठेवूनच मसालेदार मनोरंजक चित्रपटातून काम करायला सुरुवात केली तेव्हा बरेच काही घडले. कलात्मक चित्रपटातून काम करताना बौद्धिक आनंद, चित्रपट महोत्सवातून दाद, चित्रपट अभ्यासक, विश्लेषक यांच्याकडून कौतुक, मानाचे अनेक पुरस्कार हे मिळत जातात. पैसा मिळवायचा तर सेटबाहेर विचारचक्र बाजूला ठेवून मसालेदार चित्रपटात काम करा, हे अलिखित सूत्र आहे. खुद्द नसीरुद्दीन शाह यांनीही फार पूर्वीच आपल्या मुलाखतीतून ते मान्य केले. कधी त्यांचे अशा चित्रपटातून काम करताना वादही झाले.
व्यावसायिक चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी पाऊल टाकताच त्यांना सोनम नायिका मिळाली. तेदेखील दोन चित्रपटांत. गुलशन राॅय निर्मित व राजीव राॅय दिग्दर्शित ‘त्रिदेव’ (१९८९) या मल्टीस्टार चित्रपटात आणि त्या धक्क्यातून नसीरुद्दीन शाह यांचे निस्सीम चाहते सावरण्यापूर्वीच याच जोडीला कपिल कपूर दिग्दर्शित ‘चोर पे मोर’ (१९९०) याही चित्रपटांसाठी निवडले गेले. त्यात करण शहा व नीलम ही आणखीन एक जोडी होती. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला नसीरुद्दीन शाह नक्कीच माहीत असतील, कारण त्यांची प्रचंड गुणवत्ता, उत्तम भूमिका, सातत्य, स्पष्टवक्तेपणा; पण सोनम माहीत नसावी. ग्लॅमर गर्ल एवढीच ओळख. ती अनेक अभिनेत्रींची असते. तशी ओळख होईपर्यंत अनेकींची कारकीर्द संपते. नवीन येतात. छान दिसणे आणि उत्तम अभिनय या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत हे समजेपर्यंत उशीर झालेला असतो. सोनम ही दिग्दर्शक यश चोप्रा यांचे फाईंड. त्यांच्या ‘विजय’ चित्रपटात तिने समुद्रकिनाऱ्यावर बिकीनीमध्ये दृश्य दिल्याने ती एकदम चर्चेत आली. गाॅसिप्स मॅगझिनमधून ते फोटो गाजले. सिनेमाच्या जगात कशाला, कधी, का, केव्हा, कोणाला असे प्रश्न करायचे नसतात आणि जरी केलेत नि उत्तर मिळाले तरी त्याचा काहीच उपयोग नसतो. हेच तर या क्षेत्राचे वैशिष्ट्य.
नसीरुद्दीन शाह व सोनम याच जोडीवरील पडद्यावरचे गाणे नसीरुद्दीन शाह व आशाजी गायल्या. ‘हाय वो दिन कब आयेगा जब...’ हे ते गाणे. सोनम हे गाणे गात गात नसीरुद्दीन शाह यांना प्रश्न करतेय आणि त्यावर नसीरुद्दीन शाह गद्यातून उत्तर देतात, चल हट पागल लडकी... नंतरच्या कडव्यातही तिचे गाणे आणि त्यांचे समजावणे आहे. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील हिरवळीवर सुरू झालेले गाणे वांद्र्यातील कार्टर रोड इत्यादी ठिकाणी रंगते. नसीरुद्दीन शाह यांनी गद्यात का होईना; पण गायची दाखवलेली सहजता कॅमेऱ्यासमोर गाणे सादर करतानाही आहेच. सोनमचे भाग्य तिला नसीरुद्दीन शाहसोबत दोन चित्रपट मिळाले, त्यात ‘ओये ओये... तिरछी टोपीवाले’ (त्रिदेव) हे लोकप्रिय गाणे. त्यात नसीरुद्दीन शाह छान नाचले. तशी अपेक्षा नव्हतीच; ते यातही लक्षात राहिले.
कलाकारांनी गाऊच नये, असे नाही. अनेक कलाकार अधूनमधून गायलेत. आपण आपल्याच आवाजात पडद्यावर गावे, ही इच्छा चांगली. कोणाला ती जमते. कोणाला गाण्यात हसण्यावारी न्यायचीही संधी मिळते. ‘आसमान से आया फरिश्ता’ (ॲन इव्हिनिंग इन पॅरीस) या पॅरीसच्या भर समुद्रातील धमाकेदार गाण्यात हेलिकॉप्टरला लटकलेल्या शम्मी कपूरच्या उत्स्फूर्तपणाशी मोहम्मद रफी यांचा आवाज मिसळून गेलाय आणि त्यात ज्जा... ज्जा... असे लाडे लाडे म्हणण्याची (त्या गाण्याचाच एक भाग) शर्मिला टागोरची स्वीमिंग काॅश्चुममधील अदा तिच्याच आवाजात ध्वनिमुद्रित झाल्याने रंगत आली. शर्मिला टागोरने इतकसे गायले त्याची चक्क फोटो बातमी झाली. जरासे गा, पद्यात गा वा गद्यातून गा, तसा फोटो दिसला की ते गाणे एकदा तरी ऐकण्याची उत्सुकता आपोआप वाढते.
नसीरुद्दीन शाह जे काही गायले तेव्हाही तेच झाले. ते गाणे विसरले गेले. छायाचित्र मात्र बोलके राहिले... नसीरुद्दीन शाह यांच्या अष्टपैलुत्वातील ही एक गोष्ट...
(लेखक ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)