Nanded News : रुग्णांच्या आरोग्याशी खेळ; आयसीयू वॉर्डातील एसी बंद, रुमाल फडकून द्यावी लागतेय हवा
esakal March 16, 2025 02:45 PM

नांदेड : विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या विष्णुपूरी येथील डा. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील गंभीर आजाराच्या रुग्णांना दाखल केलेल्या वॉर्डातील एसी बंद अवस्थेत असल्याने चक्क रुग्णांच्या नातेवाईकांना हात रुमाल फडकवत रुग्णांना हवा द्यावी लागत आहे.

हा गंभीर प्रकार येथील शासकीय रुग्णालयात सुरू असून रुग्णांच्या आरोग्याशी रुग्णालय प्रशासनाचा खेळ सुरू असल्याचे दिसून येते. नांदेड जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयातील ३० नंबरच्या वॉर्डात गंभीर आजाराचे रुग्ण दाखल करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी अशा गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना आयुसीयूमध्ये दाखल केलेले असले तरी याठिकाणी शनिवार ता.१५ रोजी एन दुपारच्या सुमारास एसी बंद असल्याचे दिसून आले.

त्यामुळे वाढत्या तापमानात रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वार्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली असून उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. परंतु, याचे कुठलेच गांभीर्य प्रशासनाला असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या रुग्णालयाची इमारत टोलेजंग असली तरी येथे रुग्णांना सोयीसुविधांची वाणवा असल्याने अपघात व अन्य गंभीर आजारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे.

अनेक रुग्णांना आरोग्याच्या गंभीर समस्या असून, वाढत्या उकाड्याच्या वातावरणामुळे त्यांच्या आरामात आणि उपचारांमध्ये अडथळा येत आहे. रुग्णांना फडक्याने किंवा रूमालाने नातेवाईकांना फडकवून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा मानसिक आणि शारीरिक ताण वाढल्याने रुग्णाच्या जीवीताला धोका पोहचण्यची भिती आहे.

औषधी आणावी लागेत बाहेरून

येथे रुग्णालयात येणारे ग्रामीण भागातील गोरगरीब, मध्यम वर्गातील रुग्ण मोठ्या संख्येने असतात. परंतु, येथे आल्यानंतर ओपीडीला तपासणी केल्यावर औषधी लिहून दिली जाते. पण, प्रिसकेप्शनवरील अर्धेअधिक औषधी उपलब्ध नसल्याने बाहेरून आणावी लागते. त्यामुळे अर्थिक भूर्दंड सर्वसामान्यांना सोसावा लागतो.

स्वच्छतेसाठी कर्मचारी अपुरे

येथील जिल्हा सामान्य रुग्णालय खूप मोठ्या जागेमध्ये विस्तीर्ण असू त्याचा व्याप मोठा आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारामध्ये अनेकदा श्वास तसेच वराहांचा वावरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळतो. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना या अनुभव येत असतो. प्रत्येक वार्डाची स्वच्छता दिवसातून किमान दोनवेळा होणे आवश्यक असताना काही वार्डत एकदाही झाडू मारला जात नसल्याची स्थिती आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर स्वच्छतेसाठी कर्मचारी अपुरे असल्याचे कारण दिले जाते.

अनेक वॉर्डात सुविधांची वानवा

शासकीय रुग्णालयात स्व्छतेचे तीनतेरा वाजत असून अनेक सुविधांची वानवा दिसून येते. काही वार्डातील पंखेही बंद असून नियमत साफसफाई होत नसल्याचे चित्र आहे. तसेच प्रत्येक वार्डात रुग्णांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आवश्यक असताना पाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची सोयीसुविधेसाठी तरतूद करूनही प्रत्यक्षात त्या रुग्णांना मिळत नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.