कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर सुरू असलेल्या पुणे- बंगळूर महामार्गाच्या उड्डाणपुलाचा सेगमेंट बसवित असताना, तो अचानक कोसळल्याने दोन मजूर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. संबंधितांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली होती.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची नावे दिनेश संतुराज राजपूत (वय २८) आणि हरिंदर ब्रिजराज सिंग (दोघेही मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावर गेल्या दिड वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ते आजही सुरू असताना रात्री पावणेदहाच्या सुमारास क्रेनच्या साह्याने पुलाचा सेगमेंट बसवण्यात येत होता. त्यादरम्यान अचानक पुलाचे सेगमेंट खाली जमिनीवर कोसळल्याने त्याखाली दोन मजूर सापडले. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सेगमेंट पडताना मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी ते पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी तसेच वाहतूक व शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली होती.