पाकिस्तानात झेलम येथे काल रात्री गोळीबार झाला. त्यात मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद जखमी झाल्याची माहिती आहे. त्याला रावळपिंडी येथे सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सईद पाकिस्तानी सैन्याचा कोर कमांडर मंगलाला भेटून परत येत होता. त्याचा भाचा अबु कताल याचा खात्मा झाला आहे. मीडियामध्ये अशी सुद्धा बातमी आहे की, अबु कतालसोबत हाफिज सईद सुद्धा मारला गेला. पण असं नाहीय. हाफिज सईद अजून जिवंत आहे. गोळीबारात जखमी झालेल्या हाफिजवर उपचार सुरु आहेत.
हाफिज सईद 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जातो. त्यात 160 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2006 साली मुंबईत झालेल्या ट्रेन बॉम्बस्फोटात सुद्धा हाफिज सईदचा हात होता. 2001 साली भारतीय संसदेवर सुद्धा सईदने हल्ला केला होता. तो NIA च्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत होता. मुंबई हल्ल्यानंतर त्याला आमच्याकडे सोपवा असं भारताने पाकिस्तानला सांगितलं होतं. पण पाकिस्तान त्याला दहशतवादी म्हणून मान्य करायला तयार नव्हता.
रियासी हल्ल्यााचा मास्टरमाइंड
पाकिस्तानच्या झेलममध्ये शनिवारी रात्री भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड हाफिज सईदचा भाचा नदीम ऊर्फ अबू कताल मारला गेला. अज्ज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. कताल हा जम्मू-कश्मीरच्या रियासीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला होता. 41 जण जखमी झाले होते. अबू कताल राजौरी हल्ल्यातही सहभागी होता. 1 जानेवारी 2023 रोजी हा हल्ला झाला होता.
लश्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर
अबू कताल जमात उद-दावाचा टॉप कमांडर होता. हल्ल्यात अबू कतालसह त्याच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. अबू कतालने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते. दहशतवादी संघटनेचा तो महत्त्वाचा ऑपरेटिव होता. हाफिज सईदने जम्मू कश्मीरमध्ये मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी अबु कतालवर सोपवली होती. हाफिजने कतालला लश्करचा चीफ ऑपरेशनल कमांडर बनवलं होतं.