वणवे लावल्यामुळे गवत, झाडेझुडपे जळून हवेत प्रदूषण वाढते. वन्यजीव आणि वनसंपदेची मोठी हानी होते. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मूठभर लोक स्वार्थासाठी त्याला संपवणार असतील, तर वनसंपदा वाढीसाठी मोहिमा राबवून उपयोग काय? त्यामुळेच त्यांना आता चाप लावण्याची आवश्यकता आहे. ढेबेवाडीजवळ फळबागेत घुसलेला वणवा आटोक्यात आणताना शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने या प्रश्नाची दाहकता गंभीरपणे पुढे आली आहे.
- संजय शिंदे
आपल्याकडे मानवनिर्मित वणवा लावण्याचे प्रमाण अधिक आहे. वणवे लावल्यामुळे गवत, झाडेझुडपे जळताना विषारी वायू हवेत मिसळून प्रदूषण वाढते. वन्यजीव आणि वनसंपदेची मोठी हानी होते. जंगलकडे बोडके झाल्याने जमिनीची धूप, कडे कोसळण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळेच वणव्यांच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा स्थितीत वणवा लावणाऱ्यांची अजिबात गय करता कामा नये. ढेबेवाडीजवळच्या आंब्रुळकरवाडीत फळबागेत घुसलेला वणवा आटोक्यात आणताना शेतकऱ्याच्या दुदैवी मृत्यूने आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
मोठ्या कष्टाने जोपासलेली फळबाग आगीत भस्मसात होत असताना ती वाचविण्यासाठी शेतकऱ्याने केलेले प्रयत्न अपुरे ठरले. त्या आगीतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. जावळी तालुक्यातील मोहाट व पिंपरी गावाच्या दरम्यान डोंगराला लावलेल्या वणव्याने परिसरात उभ्या असलेल्या दोन आराम बस जळून खाक झाल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही घटनांपासून बोध घेण्याची आवश्यकता आहे.
वणवे रोखण्यासाठी वन खाते आणि सरकारच्या पातळीवर जनजागृतीपासून ते दंडात्मक कारवायांपर्यंत पावले उचलली गेली आहेत. अगदी वणवे लावणाऱ्यांची माहिती कळवा अन् बक्षीस मिळवा, अशी योजनाही वन विभागाने जाहीर केली आहे. या उपाययोजनांपासून ते आधुनिक उपग्रहाद्वारे जंगलावर देखरेख आणि लागलेल्या वणव्यांची नोंद घेऊन प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करण्यासाठी संपर्क यंत्रणा आणि त्याद्वारे आग वेगाने विझवणे यावर भर दिला जात आहे. वणवे रोखण्यासाठी जाळरेषा केल्या जात आहेत.
जंगल परिसरातील गावात जंगलाशी असलेले भावनिक नाते अधिक बळकट करावे. जंगलातून रोजगारासह मिळणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीबाबत भान आणले पाहिजे. महाबळेश्वर, पाचगणी परिसरात काही सेवाभावी संस्था वणवे लागू नये आणि लागलेच तर कसे आटोक्यात आणावे, याबाबत स्थानिकांमध्ये जाणीव जागृती करत आहेत. अशा संस्थांचे जाळे आणखी विस्तृत करावे लागणार आहे. वन खात्यानेही गेल्या काही वर्षांत खंबीर पावले उचलली आहेत. वणवे लावणाऱ्यांना अटक करणे, दंड करणे अशा कारवाया केल्याने विघातक प्रवृत्तींना चाप बसला आहे. तथापि, अशा कारवायांची व्याप्ती वाढवली तरच जरब बसणार आहे.
पर्यावरणीय संस्कार गरजेचेवणवा लागूनही तो आटोक्यात आणण्याऐवजी बघ्याची भूमिका घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. हे फार घातक आहे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम अगदी घराच्या दारात आले, तरीही समाज जागा होत नसल्याचे अशा घटनांमधून अधोरेखित होत आहे. परिणामी, शालेय जीवनातच पर्यावरणीय संस्कार करण्याची गरज निर्माण होत आहे.