मित्रांसोबत पोहायला गेलेला तरुण वारणा नदीत बुडाला; 50 फूट पोहत गेला अन् भोवऱ्यात अडकला, मित्रांच्या डोळ्यादेखत प्रकार
esakal March 17, 2025 03:45 PM

गुढीपाडवा (Gudi Padwa) सण जवळ आल्याने काल सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आदित्य दाभोळकर हा आपल्या कुटुंबासमवेत धुणे धुण्यास वारणा नदीवर गेला होता.

कोडोली : वारणा नदीमध्ये (Warna River) पोहण्यास गेलेला तरुण बुडाला. आदित्य दीपक दाभोळकर (वय २२, रा. निवृत्ती कॉलनी, कोडोली, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सायंकाळी सात वाजेपर्यंत शोध घेऊनही त्याचा मृतदेह सापडला नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, (Gudi Padwa) सण जवळ आल्याने काल सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आदित्य दाभोळकर हा आपल्या कुटुंबासमवेत धुणे धुण्यास वारणा नदीवर गेला होता. धुणे धुवून तो घरी परत आला व दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान तो परत आपले मित्र विराज वगरे व शुभम साठे यांच्याबरोबर पोहण्यास नदीला गेला.

आदित्य याने चिकुर्डे बंधाऱ्यावरून वीस फूट उंचावरून सर्वप्रथम नदीपात्रात उडी घेतली. तो ५० फूट पोहत गेला. पण काही अंतरावर तो नदी पात्रात मध्यभागी पाण्याच्या भोवऱ्यामध्ये अडकून गोल फिरायला लागल्याने तो मोठमोठ्याने ओरडू लागला. यावेळी त्याच्या दोन मित्रांनी पाहिले व त्याला वाचवण्यासाठी त्यांनी नदीमध्ये उडी टाकली. परंतु आदित्य नदीपात्रात दिसेनासा झाला. याबाबतच मित्रांनी त्याच्या घरी सांगताच आदित्यची आई, भाऊ व नातेवाइकांनी नदीकाठी तातडीने धाव घेतली.

लोकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली होती. सुमारे चार तास नदीपात्रात शोध घेण्यात आला. परंतु आदित्यचा मृतदेह आढळून आला नाही. या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिस, वडगाव पोलिस व कुरळप पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेवून आपत्कालीन व्यवस्थापला या घटनेची माहिती दिली. परंतु अंधार पडू लागल्याने ते आले नाहीत. आज सकाळी परत शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.