भारतीय वंशाची नासाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचे दीर्घ प्रतीक्षेनंतर आता पृथ्वीवर पुनरागमन होत आहे. अवघ्या 8 दिवसांच्या छोट्याशा मिशनसाठी गेलेल नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघे तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 9 महिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) अडकून पडले होते. तांत्रिक बिघाडांमुळे, कारणांमुळे त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन सतत लांबणीवर पडत राहिलं. पण आता 18 मार्चला ते दोघे अखेर स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतणार आहे. ISS वर 9 महिने घालवल्यानंतर, त्यांना या दीर्घ मोहिमेसाठी त्यांना नक्की किती पगार मिळणार ?, नासा त्यांना काही अतिरिक्त पैसे देईल का? असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे.
नासा देणार अतिरिक्त पगार ?
NASA मधील अंतराळवीर हे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासाठी वेगळा ओव्हरटाइम पेमेंट असे निश्चित नाही. त्यांचा पगार GS-15 पे ग्रेड अंतर्गत येतो, जो अमेरिकेतील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना दिला जातो. त्यानुसार सुनीता विल्यम्सना त्यांच्या 9 महिन्यांच्या दीर्घ मिशनसाठी अंदाजे 81 लाख ते 1.05 कोटी रुपये पगार मिळणार आहे. पण इतका वेळ अंतराळात राहिल्याच्या बदल्यात त्यांना काही मोठा बोनस मिळेल असे वाटत असेल तर हा गैरसमज आहे, असं काहीच होणार नाही.
फक्त एवढे मिळणार अतिरिक्त पैसे
NASA अंतराळवीरांना दिवसाला फक्त 4 डॉलर ( सुमारे 347 रुपये) असा अतिरिक्त भत्ता देतं. त्यामुळे, या मिशनच्या संपूर्ण 287 दिवसांचे मिळून त्यांना फक्त 1, 148 डॉलर्स ( 1 लाख रुपये) एकूण अतिरिक्त पेमेंट मिळेल. इतके महिने अंतराळात राहून आणि जोखीम पत्करूनही त्यांना एवढेच पैसे मिळतील, हे जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल.
स्पेसक्राफ्ट चा धोका काय ?
SpaceX Falcon 9 रॉकेट सुमारे 3 तासात 400 किमी प्रवास करेल आणि अटलांटिक महासागर किंवा मेक्सिकोच्या आखातात खाली पडेल. पण पृथ्वीवर परतणे इतके सोपे नाही. तज्ञांच्या मते, जेव्हा ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा त्याचा कोन पूर्णपणे बरोबर असणे आवश्यक आहे.
छोटीशी चूकही झाली तर मोठी दुर्घटना घडू शकते. याआधीही अंतराळ मोहिमेदरम्यान चुकीच्या एन्ट्री अँगलमुळे क्रूला अडचणींचा सामना करावा लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स आणि तिची जोडीदार बुच विल्मोर यांच्या जागी ॲन मॅक्लेन, निकोल आयर्स, ताकुया ओनिशी आणि किरिल पेस्कोव्ह हे आयएसएसवरील नवीन मिशन हाताळतील.